COVID-19 : कर्नाटकात मास्क घातला नाही तर 200 रुपये दंड

बंगलुरु : वृत्त संस्था – कर्नाटक सरकारने बंगलुरु शहरात सार्वजनिक ठिकाणी मास्क घातला नाही तर २०० रुपये दंडाचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी बंगलुरु शहरात सुरु करण्यात आली आहे. एकाच दिवसात बंगलुरु शहरात तब्बल १ हजार ७१५ मास्क न घालणार्‍यांना पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडून ३ लाख ४३ हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.

यापूर्वी वाहतूक नियमभंग केला तर तडजोडीपोटी जागेवरच वाहनचालकांकडून दंड वसुल केला जात होता. कोरोनाचे जागतिक संकट लक्षात घेऊन सार्वजनिक ठिकाणी मास्क अथवा चेहरा झाकणारे रुमाल वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. अशा लोकांना यापूर्वी ताकीद दिली जात असे किंवा त्यांच्यावर १८८ कलमान्वये गुन्हा दाखल केला जात होता. मात्र, त्यांची संख्या वाढल्यावर व पोलिसांची डोकेदुखी वाढल्याने अशा लोकांकडून थेट जागेवरच दंड वसुली करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.