सोमवारी सकाळी चक्रीवादळ अधिक सक्रिय होणार ! पुण्यासह या जिल्ह्यात 2 दिवस पावसाची शक्यता

पुणे: पोलीसनामा ऑनलाइन – भारताच्या पश्‍चिमी किनारपट्टीवर तौक्ते चक्रीवादळाने धुमाकुळ घातल्यानंतर आता पूर्व किनारपट्टीवर आणखी एका चक्रीवादळासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे हवामान विभागाने यास चक्रीवादाळाचा इशारा दिला आहे. शनिवारी अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून सोमवारी (दि.24) सकाळी यास चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. त्यानंतर ते अधिक सक्रीय होण्याची शक्यता आहे. या दरम्यान पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात 24 आणि 25 मे रोजी मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मराठवाडा अन् लगतच्या भागावर असलेला चक्रीय चक्रवात आता विरुन गेला आहे. सध्या कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मॉन्सूनपूर्व सरी कोसळत असून पुढील 2 दिवस सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. चक्रीवादळात रूपांतर झाल्यावर 26 मेला ते पश्चिम बंगाल अन् ओडिसाच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र रविवारी अंदमान बेटावरील पोर्ट ब्लेअरपासून 560 किमी अंतरावर होते. ओडिशातील पारादीपपासून ते 590 किमी आणि बालासोरपासून 690 किमी दूर आहे. तर, पश्चिम बंगालमधील दिघापासून 670 किमी अंतरावर होते. सोमवारी सकाळी या कमी दाबाच्या क्षेत्राचे यास चक्रीवादळात रुपांतर होईल. त्यानंतर पुढील 24 तासात त्याचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर होईल. त्यानंतर 26 मे रोजी त्याचे अतितीव्र चक्रीवादळात रुपांतर होऊन ते पश्चिम बंगालमधील सागर आणि ओडिशाच्या पारादीप किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ जमिनीला धडकल्यानंतर बिहार, झारखंडपर्यंत त्याचा प्रवास राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.