जेजुरी दसरा पालखी सोहळा व देवभेटीच्या परवानगी बाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या दसरा उत्सवावर कोरोना संसर्गाचे सावट असून दसरा पालखी सोहळा व देवभेट करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन परवानगी घेण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या बैठकीत झाला असल्याचे देवाचे प्रमुख मानकरी राजेंद्र पेशवे यांनी सांगितले .

महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या वर्षाकाठी जेजुरीत आठ यात्रा भरतात, यातील दसरा उत्सवाला धार्मिक महत्व आहे. अठरापगड जाती धर्माचा सामाजिक सलोखा राखणारा हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतो .

मार्च महिन्या पासून खंडोबा मंदिर बंद असून या सहा ते सात महिन्यात सोमवती यात्रा ,चैत्र पौर्णिमा यात्रा कोरोनाच्या संकटामुळे रद्द झाल्या आहेत .आता दसरा उत्सवावरही कोरोनाचे सावट आहे. दसरा उत्सव,पालखी सोहळा व देवभेट या संदर्भात चर्चा करण्यासाठी श्री खंडोबा पालखी सोहळा,खांदेकरी मानकरी व समस्त ग्रामस्थ मंडळाच्या वतीने गुरुवार दि 8 रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण देशभर कोरोनाच्या संकटामुळे यात्रा, जत्रा, उत्सवावर बंदी असल्याने भाविकांच्यात मोठी नाराजी आहे . दसरा उत्सवा दिवशी खंडोबा देवाचा पालखी सोहळा, देवभेट घेणे याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन परवानगी घ्यावी असा निर्णय ग्रामस्थांच्या या बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीला देवाचे मुख्य मानकरी राजेंद्र पेशवे,पालखी सोहळा समितीचे अध्यक्ष गणेश आगलावे, जेजुरी देवसंस्थांचे विश्वस्त पंकज निकुडे, माजी विश्वस्त सुधीर गोडसे, पश्चिम महाराष्ट्र मठ मंदिर समितीचे राजेंद्र चौधरी, नगरसेवक जयदीप बारभाई, पालखी सोहळा समितीचे पदाधिकारी रमेश राऊत, अरुण खोमणे, जालिंदर खोमणे, अमोल शिंदे,  खंडेराव काकडे, अशोक खोमणे, माणिक पवार, सीताराम दोडके,द त्ता सकट, किसन कुदळे, सतीश दोडके आदी उपस्थित होते.