राज्य मंत्रीमंडळाचा मोठा निर्णय ! आदित्य ठाकरे यांच्या खात्याचं नाव बदललं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्य मंत्रिमंडळातले वजनदार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आवडत्या पर्य़ावरण विभागाचं नाव आता बदललं आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाचे नाव आता पर्यावरण व वातावरण बदल विभाग असे करण्यात आले आहे. आहे. राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक आज (मंगळवार) पार पडली असून, या बैठकीत पर्यावरण विभागाचे नाव बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. पर्यावरणात होत असलेले बदल आणि त्याचा सामान्य माणसांवर होत असलेला परिणाम या सगळ्यांची दखल घेत हा मोठा बदल केल्याचे बोलले जात आहे.

पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग हा निसर्गाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांवर कार्य करेल. पृथ्वी तत्वाशी संबंधित वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व जमिनीचे धुपीकरण इत्यादी बाबींवर हा विभाग कार्य करेल. तसेच हवेच्या गुणवत्तेसाठी हा विभाग उद्योग, परिवहन व इतर विभागांना सहकार्य करून वायू प्रदूषण कमी करून महाराष्ट्रातील हवेची गुवणता सुधारेल व वायू तत्वाचे संरक्षण करेल.

जल तत्वाशी संबंधित नदी संवर्धनाच्या सद्य:स्थिती चालू कामांसह सागरी जैव विविधता, जलस्त्रोतांचे संवर्धन व संरक्षण तसेच सागरी किनारे यांची स्वच्छता यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. अग्नी तत्वाशी संबंधित उर्जा स्त्रोत म्हणून अन्य विभागांसह कार्य करीत ऊर्जेचा परिणामकारक वापर, ऊर्जा बचत तसेच ऊर्जेचा अपव्यय टाळणे या बाबींना प्रोत्साहन देत, अपारंपारिक ऊर्जेच्या निर्मितीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम, महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या जागा, पडिक जमिनी, शेतांचे बांध या सारख्या जागांवर राबविल.

आकाशाच्या विविध संकल्पनांपैकी हा विभाग आकाश या तत्वास स्थळ व प्रकाश या स्वरुपात निश्चित करून मानवी स्वभावातील बदलांसाठी जनजगृती व शैक्षणिक कार्यक्रमांद्वारे जनमानसात आपल्या कृतीद्वारे आपला भवताल अधिक समृद्ध करण्यासाठी प्रवृत्त करेल.