पार्क केलेल्या ट्रकचे टायर चोरणारा गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मोकळ्या जागेत पार्क केलेल्या ट्रकचे टायर चोरून त्याची विक्री करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकाला अटक केली. ही कारवाई नायगाव फाटा कुंजीरवाडी येथे करण्यात आली. ट्रकच्या टायर चोरीचा गुन्हा लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल आहे.

सागर दत्तात्रय विचारे (वय २२, रा. नायगाव, माळवाडी, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०१८ मध्ये लोणी काळभोर येथील श्रीकृष्ण मंगल कार्यालयाच्या पाठीमागे पार्क केलेल्या चार दाहाचाकी ट्रकचे प्रत्येकी दोन असे एकूण आठ टायर चोरुन नेले होते. याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास लोणी काळभोर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस करीत होते.

आज (बुधवारी) स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी महिती मिळाली की, या गुन्यातील आरोपी नायगाव फाटा कुंजीरवाडी येथे चोरीचे टायर विकण्यासाठी येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून आरोपी सागर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने टायर चोरल्याचे सांगितले. त्याच्याकडून १ लाख ५० हजार रुपये किमतीचे आठ टायर जप्त करण्यात आले. पुढील कारवाईसाठी आरोपीला लोणी काळभोर पोलीस तपास करीत आहेत.