पुण्यासह अनेक ठिकाणी दुध टँकर फोडण्याचे प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

राज्यातील काही सहकारी व खासगी दूध उत्पादकांनी दूध दरात केलेली तीन रुपयांची दरवाढ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी फेटाळून लावत रविवारी ( १५ जुलै ) रात्री १२ वाजेपासून दुधाचे आंदोलन सुरू केले. राज्यात ठिकठिकाणी दुधाचे टँकर अडविण्यात आले. हे आंदोलन मोडून काढण्यासाठी सरकारने कंबर कसली असून आंदोलकांची धरपकड सुरू केली आहे. खा. राजू शेट्टी यांनी रविवारी रात्री बारानंतर पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोर आंदोलन केले.

[amazon_link asins=’B07DRMRMGV’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’def54ebd-88b0-11e8-8321-6ff954455eac’]

स्वाभिमानी संघटनेने सुरु केलेल्या दुधबंद आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण मिळाले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव येथील गोवर्धन दुध संघाचा टँकर फोडून दूध रस्त्यावर सोडून दिले. सोलापूर रोडवरील वरवंड टोलनाक्यावर टँकरमधील दूध ओतून देण्याचा प्रकार घडला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच संघांनी सोमवारी दूध संकलन बंदचा निर्णय घेतला आहे. एक दिवसआधीच संघांनी दूध संकलन बंद ठेवले.
संगमनेरवरुन औरंगाबादला जाणारा दुधाचा आयशर टेम्पो तालुक्यातील हडस पिंपळगाव येथे रविवारी रात्री फोडला. दूध दरावाढीच्या मुद्यावर आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी नंतर त्या टेम्पो मधील दुधाचे संपूर्ण केरेट रस्त्यावर फेकले. अमरावतीतील वरुड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी रात्री दुधाचा टँकर पेटवून देण्याचा प्रयत्न केला.

राज्यात अनेक ठिकाणी पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली तर अनेकांना नोटिसा बजावल्या आहेत. मुंबईमध्ये दुधाची टंचाई जाणवू नये, म्हणून अगोदरच अधिक दुध पुरवठा करण्यात आला असून दोन दिवस पुरेल, इतके दुध सध्या मुंबईतील विविध दुध संकलन केंद्रात जमा आहे. त्यामुळे किमान दोन दिवस तरी मुंबई टंचाई जाणवणार नाही.