Ajit Pawar | ‘कर्ज काढून राज्य चालवतोय, PM मोदींनी महाराष्ट्राला भरीव मदत करावी’ : अजित पवार

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – “परतीच्या पावसामुळे राज्यात मोठे नुकसान झाले आहे. मुंबईत राज्यातील नुकसानीची आढावा बैठक सोमवारी घेण्यात येणार आहे. त्यानंतर केंद्र सरकारकडे निधीची मागणी केली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला भरीव मदत करावी. गेल्या सहा महिन्यांपासून कर्ज काढून राज्याचा कारभार सुरू आहे,” असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगितले.

अजित पवार पंढरपुरात आले होते. अतिवृष्टी आणि महापुरामुळे पंढरपूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कुंभार घाटाजवळ सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्याची पाहणी करण्यासाठी अजित पवार आज पंढरपूर येथे आले होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

अजित पवार म्हणाले की कोरोनाच्या संकटात पुन्हा राज्यावर अतिवृष्टी आणि महापुराचे संकट आले आहे. यामुळे राज्य सरकारचीदेखील आर्थिक कोंडी झाली आहे. राज्याचे जीसटीचे तब्बल 60 हजार कोटी रुपये केंद्राकडून येणे आहेत. राज्यापुढे अनेक आर्थिक अडचणी असून केंद्र सरकारने जीएसटीचे 60 हजार कोटी रुपये तातडीने द्यावेत, अशी मागणीही पवार यांनी या वेळी केली. सोमवारी मुंबईत राज्यातील महापुराच्या नुकसानीची आढावा बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर केंद्र सरकारकडे निधीची मागणी केली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला भरीव मदत करावी.

अजित पवार यांनी पंढरपुर तालुक्‍यातील पटवर्धन कुरोली, भोसे आदी ठिकणच्या पावासामुळे नुकसान झालेल्या पिकांची आणि रस्त्यांची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधला. प्रांताधिकारी सचिन ढोले, जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, आमदार भारत भालके, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत कदम, राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हा अध्यक्ष मारुती जाधव, श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष संदीप मांडवे आदी या वेळी उपस्थित होते.