ज्यांना रामाच्या अस्तित्वाचा पुरावा हवा आहे, त्यांनाच रामनवमीची सुट्टी : भाजप खासदार परेश रावल

ADV
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कळीचा मुद्दा झालेल्या राम जन्मभूमी – बाबरी मशीद वादाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे. या प्रकरणात ८ मार्चला झालेल्या सुनावणीमध्ये मध्यस्थीसाठी तीघांची नियुक्ती करून हे प्रकरण मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, भाजपचे खासदार व अभिनेते परेश रावल यांनी या प्रकरणावर टिप्पणी करणारं ट्विट केलं आहे. जे सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होतांना दिसत आहे.

या ट्विटमध्ये परेश रावल यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सुट्टीचा संदर्भ देत, ज्या रामाच्या अस्तित्वाचा पुरावा न्यायालयाला हवा आहे, त्याच न्यायालयाला रामनवमीची सुट्टी असल्याचे म्हटले आहे. त्यांनी केलेलं ट्विट असे की, ‘ज्या सर्वोच्च न्यायालयात भगवान रामाच्या जन्माचा पुरावा मागणाऱ्या खटल्यावर सुनावणी होणार आहे त्याच न्यायालयाला १३ एप्रिल रोजी रामनवमीची सुट्टी आहे.’

देशभरात १३ एप्रिलला रामनवमी साजरी केली जाणार आहे. उत्तर भारतात मोठ्या उत्साहात रामनवमी साजरी केली जाते. त्या दिवशी न्यायालयालाही सुट्टी आहे. यालाच लक्ष करत परेश रावल यांनी हे ट्विट केलं आहे. त्यांच हे ट्विट क्षणार्धात सोशल मीडियामध्ये प्रचंढ व्हायरल झालं आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश फकीर महम्मद इब्राहिम खलिफउल्ला यांच्या नेतृत्वाखाली मध्यस्थ समिती नेमली असून त्यात वरिष्ठ वकील श्रीराम पांचू आणि आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांचा समावेश आहे. या मध्यस्थ पथकाला चार आठवडय़ांत कामातील प्रगतीचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. एकूण आठ आठवडय़ांत सर्व मध्यस्थी प्रक्रिया पूर्ण करण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच राज्यसरकारला या मध्यस्थी पथकासाठी आवश्यक त्या सोयी देण्यास सांगण्यात आले आहे. मध्यस्थी प्रक्रियेतील सुनावणी ही गोपनीय राहणार आहे. त्या वेळी मुद्रित वा इलेक्ट्रॉनिक अशा कोणत्याही माध्यमांच्या प्रतिनिधींना वार्ताकनाची परवानगी दिली जाणार नाही.