चोरट्यांनी चक्क चोरले कांदे, लसूण आणि साड्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अवसरी बुद्रुक येथील चवरेमळा वस्तीत चोरट्यांनी एकाच वेळी चार घराची कुलूपे तोडून घरातील रोख रक्कम, साड्या, चांदीची जोडवी, सोन्याची चमकी असा ऐवज चोरुन नेला. त्याचवेळी एका घरातील ७ किलो कांदे आणि एक किलो लसूणही चोरुन नेल्याचे उघडकीस आले आहे.

सध्या कांद्याचे भाव वाढलेले आहेत. त्यामुळे चोरट्यांनी एका घरात मौल्यवान वस्तू न मिळाल्याने त्यांनी तेथील कांदे व लसूण चोरुन नेले. अवसरी बुद्रुक येथील चवरेमळा येथील आशा चवरे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी साड्या, सोन्या चांदीच्या वस्तू असा २० हजार रुपयांचा ऐवज चोरला. त्यानंतर त्यांच्या शेजारी राहत असलेल्या शरद चवरे यांच्या घराचे कुलूप तोडले. घरातील ७ किलो कांदे व १ किलो लसूण चोरुन नेला. त्यानंतर चोरट्यांनी काळआंबा वस्तीतील निवृत्ती हिंगे यांच्या घराचे कुलूप तोडून साड्या चोरुन नेल्या. लक्ष्मण हिंगे यांच्या घरातील कपड्यांच्या बॅगा शेतात नेल्य. बॅगेतील साड्या चोरुन बॅग शेतात टाकून दिली.

अवसरी खुर्द येथे गेल्या आठवड्यात पाच ठिकाणी चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला होता. किराणा दुकान आणि मंदिराचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. तरीही पोलिसांना चोरट्यांना शोध लावता आला नाही. त्यानंतर रविवारी पुन्हा एकाचवेळी चार ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या आहेत.

Visit : Policenama.com