लैंगिक अत्याचार करुन खून करणारा नराधम सात तासात गजाआड

किनवट (नांदेड) : पोलीसनामा ऑनलाईन – शहराच्या पूर्व दिशेला भूमीअभिलेख कार्यालयाच्या बाजूला असलेल्या बेल्लोरीच्या एका छोट्या नाल्याच्या काठावर ३० वर्षीय महिलेच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना शनिवारी (दि.२३) दुपारी उघडकीस आली होती. मयत महिलेवर लैंगिक अत्याचार करून खून करण्यात आला होता. मयत महिलेच्या उजव्या हातावर नाव गोंदलेले असल्याने तिची ओळख पटविण्यास मदत झाली होती. या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुसद तालुक्यातील लोणदरी येथून अटक केली. पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर अवघ्या सात तासात आरोपीला गजाआड केले.

मयत महिला ही माळबोरगाव येथील असून तिचे सासर विदर्भातील पुसद तालुक्यातील लोणधरी येथील आहे. मागली वर्षी तिच्या पतीचे निधन झाले. मयत महिलेला दोन मुली असून ती माहेरी माळबोरगाव येथे राहत होती. एक मुलगी दुसऱ्या वर्गात तर दुसरी मुलगी सहा वर्षांची आहे. मांडवा (किनवट) येथील अनुदानित आश्रमशाळेत दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या आपल्या मुलीला सोडण्यासाठी ती २२ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन ते चारचे दरम्यान आली होती. ती एका दुचाकीवर आली असल्याचे तपासात समोर आले.

पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करुन पुसद तालुक्यातील लोणदरी येथून एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी आणि मयत महिला यांची किनवट येथे भेट झाली. त्यानंतर आरोपी व मयत महिलेने मुलीला शाळेत सोडले. किनवट येथे पायी येत असताना आरोपीने मयत महिलेसोबत लैंगिक अत्याचार केले.

मयत महिलेने आरोपीचे एक वर्षापूर्वी पैसे चोरले होते. यातून त्यांच्यामध्ये वाद झाले. याच वादातून मयत महिलेने आरोपीच्या बहिणी विषयी अपशब्द वापरुन शिवीगाळ केली. तसेच आरोपीला देखील शिवीगाळ केली. या रागातून त्याने महिलेच्या डोक्यात दगड मारला. महिला जिवंत असल्याचे पाहून त्याने पुन्हा दगडाने महिलेच्या डोक्यात वार केले. यामध्ये गंभीर जखमी होऊन तिचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी हा गुन्हा सात तासाच्याआत उघडकीस आणून आरोपीला अटक केली. पुढील कारवाईसाठी आरोपीला किनवट पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विनोद दिघोरे, पोलीस उपनिरीक्षक सदानंद वाघमारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल भानुदास वडजे, दशरथ जांभळीकर, पोलीस नाईक दारासिंग राठोड, राजु पांगरेकर, बालाजी सातपुते, शाम नागरगोजे, रवि बाबर, चालक श्रीरामे, विजय आडे, तानाजी येळगे, गजानन बैनवाड यांनी केली.