रिपब्लिकन ऐक्यासाठी मंत्रिपद सोडायला तयार : रामदास आठवले

महाड : पोलीसनामा ऑनलाईन – रिपब्लिकन ऐक्य होणार असेल तर मी मंत्रिपद सोडायला तयार आहे. असं वक्तव्य रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले आहे. महाड येथे चवदार तळे सत्याग्रहाच्या ९२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आठवले बोलत होते.

प्रकाश आंबेडकर यांना आवाहन करताना आठवले म्हणाले की, ‘रिपब्लिकन ऐक्य होणार असेल तर मी मंत्रिपद सोडायला तयार आहे. प्रकाश आंबेडकर रिपब्लिकन ऐक्यासाठी तयार असतील तर त्यांनी रिपब्लिकन ऐक्याचे अध्यक्ष व्हावे. तसेच मी ज्यांच्या सोबत जातो त्या पक्षाची सत्ता येते, त्यांना मुख्यमंत्री पद मिळते. त्या बदल्यात ते मला मंत्रिपद देतात तर बिघडले कुठे ? असा सवाल रामदास आठवलेंनी केला.

समाजात विनाकारण तेढ निर्माण करणे योग्य नाही –

मागसावर्गीयांसह सवर्ण समाज एकत्र आला पाहिजे असे आवाहन करताना आठवले म्हणाले की, समाजात विनाकारण तेढ निर्माण करणे योग्य नाही. समाजात समता निर्माण झाली पाहिजे. या साठी मी काम करीत असून समाजिक ऐक्यासाठी आपण शिवशक्ती भीमशक्ती एकत्र केली. मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे अशी मी पहिली मागणी केली होती. मी मात्र दोन समाजातील वाद मिटवितो.  आपसात संघर्ष करणे योग्य नाही. काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक संविधान बदलणार असा खोटा प्रचार करून भांडणे लावत आहेत असा आरोप रामदास आठवले यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर केला.

रिपब्लिकन ऐक्यासाठी पुढाकार घेतला जाणार असेल तर मी मंत्रिपदही सोडायला तयार आहे,  असे विधान रामदास आठवले यांनी यापूर्वी २०१७ मध्येही केली होते.