फडणवीसांचा अजितदादावर गाढा विश्वास, म्हणाले – हे दादा मला मारणार नाहीत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसरा दिवस मंगळवार (दि. 2) गाजला तो विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाने. फडणवीस यांनी यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. तसेच त्यांनी यावेळी सांगितलेले किस्से अन् कोपरखळ्यांनी सभागृहात खसखस पिकली. फडणवीस यांनी दिलेल्या एका धमाल उदाहरणाची काल दिवसभर चर्चा रंगली होती. सत्ताधारी बाकाकडे हात करत (अजितदादाकडे) फडणवीस म्हणाले, समजा मला या दादांनी  मारले. तसे ते मला मारणार नाहीत. पण समजा मारले तर…. फडणवीस यांचे वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच समोरून कोणीतरी म्हणाले. चंद्रकांतदादा मारतील. त्यावर फडणवीस म्हणाले, ते दादा तर बिलकुलच मारणार नाहीत. त्यावर अजितदादा स्मितहास्य करत होते. तर अजितदादा यांच्याविषयीचा फडणवीस यांचा गाढा विश्वास नेमका काय सांगून गेला, याचीच चर्चा नंतर दिवसभर रंगली होती.

फडणवीसांनी सांगितलेल्या गोष्टीतील नारायण भंडारी आहे तरी कोण?
राज्यात मंदिरांमध्ये लागू असलेले नियम आणि दारुच्या दुकानांना मोकळीक यावर फडणवीस यांनी हल्लाबोल केला. कोरोना मंदिरात आणि शिवजयंतीच्या कार्यक्रमामध्ये होतो बारमध्ये होत नाही का, असा सवाल करताना फडणवीस यांनी नारायण भंडारीचा भन्नाट किस्सा सांगितला. शाळेत एका वर्गात कोणाला मॉनिटर करायचे? यावर चर्चा सुरू असते. वर्गातले शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना विचारतात. तुला काय वाटते सांग. एक मुलगा उभा राहून म्हणतो, मी नारायण भंडारीच्या घरून तंबाखू चुना घेऊन येईन, तुम्हाला देईन. दुसरा म्हणतो मी भंडारीच्या घरून अफू गांजा आणून तुम्हाला देतो, तिसरा म्हणतो, मी दारूचा खंबा घेऊन येतो. शेवटी शिक्षक एका कोपऱ्यात बसलेल्या मुलाला विचारतात, तू मॉनिटर झालास तर काय करशील ? तो मुलगा म्हणतो, मी सकाळी लवकर उठून आंघोळ करतो. देवाला आणि वडिलधा-यांना नमस्कार करतो. त्यानंतर जेवण करून शाळेत येतो. अभ्यासात लक्ष देतो. घरी गेल्यानंतर पुन्हा हात पाय धूवून देवाला नमस्कार करतो. जेवण करतो आणि अभ्यास करत झोपी जातो. गुरुजी एकदम खुश होतात. ते म्हणतात तुझ नाव काय बेटा? मुलगा म्हणतो मा नाव नारायण भंडारी, गुरुजी म्हणाले यालाच मॉनिटर करायचे. हे उदाहरण फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारसाठी दिले.मात्र नारायण भंडारी आहे तरी कोण आणि फडणवीस कोणाला नारायण भंडारी म्हणाले याबाबत चर्चा रंगली आहे.

आमची अँटिजेन चाचणी करा
अधिवेशनाला आलेल्या आमदार, अधिकारी आणि पत्रकार यांची येत्या शनिवारी – रविवारी पुन्हा आरटीपीसीआर तपासणी करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्रासलेल्या आमदारांनी आमची अँटिजेन  चाचणी करा, पुन्हा आरटीपीसीआर करण्याची काय गरज, असे म्हणत सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे दालन गाठले. शनिवार – रविवार आम्ही मुंबईतच थांबणार आहोत. मग आमची तपासणी कशाला करता असा सवाल त्यांनी उपस्थित केला.