Pune : गोदामातून 550 किलो कांदे चोराने पळवले, एक अटकेत आणि दूसरा फरार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – देशाच्या बहुतांश भागात सध्या कांद्याच्या किंमती आकाशाला भिडल्या आहेत. कांद्याचा दर 100 रुपये प्रति किलोग्रॅमपर्यंत पोहचला आहे. यामुळे लोकांची मोठी अडचण होत आहे. तर चोरसुद्धा अशा स्थितीचा फायदा घेताना दिसत आहेत. चोरांनी पुण्यातील एका गोदामातून 550 किलोग्रॅम कांद्यांची चोरी केली. मात्र, नंतर एका चोराला पकडण्यात आले, तर एक अजूनही फरार आहे.

ही घटना पुणे जिल्ह्यातील नारायणगाव जवळीलमौजे देवजळी  गावात घडली. गावातील शेतकर्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकर्‍यांनी रात्री गोदामात कांद्याची 38 पोती ठेवली होती. यानंतर कांद्याच्या वाढलेल्या किंमती पाहाता सर्वांनी ठरवले की, या कांद्याची राखण सर्वजण मिळून दोन-दोन तास करतील. रात्री जेव्हा एका शेतकर्‍याने गोदामाची तपासणी केली, तेव्हा एक बाईक आणि एक लोडर त्यास आढळला. तर दोन लोक कांद्याची पोती लोडरमध्ये भरत होती.

या शेतकर्‍याला चोरीची शंका आल्याने त्याने आरडाओरड केली. यानंतर गाववाले जमले, परंतु ते येताच एक चोर पळून गेला, तर दुसर्‍याला शेतकर्‍यांनी पकडले. नंतर शेतकर्‍यांनी त्यांना पोलिसांकडे सोपवले. पोलिसांनी दोन चोरांची ओळख पटवली आहे. यापैकी एका चोराचे नाव संजय पराधी आणि दुसर्‍याचे पोपट काळे आहे. शेतकर्‍यांनुसार गोदामातून 10 पोती गायब आहेत.

पोलिसांचे म्हणणे आहे की, कांदे चोरी करण्याच्या आरोपाखाली दोघांवर नारायणपुर पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. एका चोराला अटक केली आहे आणि दुसर्‍याचा शोध सुरू आहे. लवकरच त्यालाही अटक केली जाईल.