पोलीस हवालदाराच्या घरात चोरी, चोरांना लागली ‘लॉटरी’ !

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – चोरट्यांनी एका पोलीस हवालदाराच्या घरात चोरी करून तब्बल सव्वा तेरा लाखांचा मुद्देमाल लंपास केला. जालना पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर चोरट्यांनी घरफोडी केल्याने खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी पोलीस ठाण्याच्या जवळ घरफोडी करत पोलिसांना जणू खुले आव्हानच दिलेय.

जालना येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस हवालदार मोमीन अब्दुल शकुर अब्दुल अजीज हे जालना पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर आपल्या कुटुंबासमवेत राहतात. ते दोन दिवसांसाठी कौटुंबीक कार्यक्रमासाठी त्यांच्या मूळगावी सेवली इथं गेले होते. हीच संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडीकोयंडा आणि कुलूप तोडून घरात प्रेवश केला. घरातील कपाटात ठेवलेले रोख 13 लाख 25 हजार रुपये चोरट्यांनी चोरून नेले. चोरट्यांना एक प्रकरे लॉटरीच लागल्याची चर्चा परिसरात आहे.

पोलीस हवालदार मोमीन हे गावावरून परत आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. जनतेचे रक्षक असलेल्या पोलिसांचे घरच सुरक्षित नसतील तर इतरांचे काय ? असा प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहे. चोरट्यांनी पोलिसांच्या घरात घरफोडी करुन लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याने पोलीस तपास चक्र फिरवून चोरट्यांच्या मुसक्या आवळतील अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/