पुण्यात चोरट्यांकडून पोलिसांवर गोळीबार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –  सराफी दुकानाचे शटर उचकटण्याच्या प्रयत्नात चोरटे असतानाच तेथे गस्तीवरील बीट मार्शल आल्याने त्यांचा चोरीचा डाव फसला. परंतु तेथून पळून जाता यावे यासाठी चोरट्यांनी पोलिसांवर गोळी झाडून पोबारा केला.पोलिसांनी गोळी चुकविल्याने सुदैवाने कोणी जखमी झाले नाही. ही घटना बोपोडीतील भाऊ पाटील रस्त्यावरील वर्धमान ज्वेलर्सच्या समोर मध्यरात्री घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी माधव कोपनर आणि त्यांचे सहकारी बुधवारी रात्री बीट मार्शल ड्यूटीला होते. त्यावेळी ते परिसरात गस्त घालत असताना बोपोडीतील भाऊ पाटील रस्त्यावरील वर्धमान ज्वेलर्सजवळ त्यांना हालचाल दिसली. त्यावेळी कोण आहे. हे पाहण्यासाठी ते गेले. तेव्हा तेथे दोन ते तीनजण दुकानाचे शटर उचकटताना दिसले. त्यांना आलेले पाहून चोरट्यांचीही धांदल उडाली. त्यातील एकाने पिस्तूलातून पोलिसांच्या दिशेने गोळी झाडली. ती कोपनर आणि त्यांच्या सहकाऱ्याने चुकविली. परंतु ती शेजारील एका खासगी वाहनाला लागली. त्यानंतर चोरट्यांनी एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधू पोबारा केला. घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. चोरट्यांचा खडकी पोलीस शोध घेत आहेत.