ध्यानस्थ अवस्थतेत पत्रकारांच्या प्रश्नांचा विचार करा ; जयंत पाटलांचा मोदींना टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभेच्या अंतिम टप्यातील प्रचार थांबल्यानंतर नरेंद्र मोदी केदारनाथ येथे दर्शन घेण्यासाठी गेले आहेत. आज सकाळी नरेंद्र मोदी हेलिकॉप्टरने केदारनाथ येथे पोहचले आहेत. दर्शन घेतल्यानंतर नरेंद्र मोदी एका गुहेत ध्यान धारणेसाठी बसले आहेत.

नरेंद्र मोदी यांचा गुहेमध्ये ध्यानधारण करत असलेला फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहून राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी ट्विटर वरून नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदीजी ‘ध्यानस्थ’ अवस्थेत पत्रकार परिषदेत टाळलेल्या प्रश्नांचा विचार करा असा टोला त्यांनी नरेंद्र मोदींना लगावला आहे.

जयंत पाटील ट्विटद्वारे म्हणाले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रसिद्धीसाठी काहीही करू शकतात. आशा आहे की मोदी आपल्या ध्यानस्थ अवस्थेत काल पत्रकारांच्या प्रश्नांना न दिलेल्या उत्तरांबाबत विचार करतील व भविष्यात आणखीन एखादी पत्रकार परिषद घेण्याचा विचार करतील.”

काल झालेल्या पत्रकार परिषदेत नरेंद्र मोदी यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे टाळले होते त्यामुळे मोदींवर विरोधक टीका करत आहेत. काल झालेल्या पत्रकार परिषदेवरून जयंत पाटील यांनी मोदींना टोला लगावला आहे.