भारतीय लष्कराला ‘मोदींची सेना’ म्हणणारे देशद्रोही : माजी लष्करप्रमुख व्ही.के.सिंग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय लष्कर हे ‘मोदी यांची सेना’ आहे, असे वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी केले होते. आदित्यनाथ यांच्या या वक्तव्यावर माजी लष्करप्रमुख आणि सध्या केंद्रीय मंत्री जनरल व्ही.के.सिंग यांनी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे. भारतीय लष्कराला मोदींची सेना म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. अशाप्रकारे सेनेचा अपमान करणारे देशद्रोही असतात, असं सिंग यांनी सांगितलं.

काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी एक व्हिडाओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये सिंग यांनी लष्कराला मोदींची सेना म्हणणाऱ्या आदित्यनाथ यांचा समाचार घेतला आहे. ‘जर कोणी भारतीय सेना ही मोदींची सेना आहे असं म्हणत असेल तर ते केवळ चुकीचं नाही तर असं म्हणणारा देशद्रोही आहे, असा हा व्हीडिओ आहे.

व्हीडिओ शेअर करत पटेल यांनी भाजपा अशा देशद्रोह्यांवर कारवाई करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. ‘जनरल व्ही.के.सिंग यांचे वक्तव्य योग्य आहे. जर कोणी भारतीय लष्कराला एखाद्या व्यक्तीचे सैनिक किंवा ‘मोदींची सेना’ असं म्हणून लष्कराचा अपमान करत असेल तर ती व्यक्ती देशद्रोही आहे. मला आशा आहे की भाजपा अशा देशद्रोहींवर योग्य ती कारवाई करेल, असं पटेल यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, भारतीय लष्कर हे ‘मोदी यांची सेना’ आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी दहशतवाद्यांना बिर्याणी खाऊ घातली तर मोदींच्या सेनेने दहशतवाद्यांना गोळी आणि गोळा (गोलाबारुद) दिला आहे. हाच त्यांच्यात आणि आमच्यात फरक आहे. मसूद अझरसारख्या अतिरेक्याच्या नावापुढे काँग्रेस नेते आदरार्थी ‘जी’ लावतात आणि दहशतवादालाच प्रोत्साहन देतात, असं वक्तव्य आदित्यनाथ यांनी गाझियाबाद येथील जाहीर प्रचार सभेत केले होते. त्यावर विरोधकांनी टीका केलीच, तर त्यासोबतच स्वपक्षीय नेत्याची त्यात भर पडली आहे.