CM उद्धव ठाकरे यांचा ’मातोश्री’ बंगला उडवून देण्याची धमकी देणार्‍याला अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान उडवून देण्याची धमकी फोनद्वारे अज्ञात व्यक्तीने दिली होती. मी दुबईवरून बोलतोय, असेही या आरोपीने म्हटले होते. या आरोपीला आता पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली आहे.

याआधी सुद्धा मातोश्रीवर फोनवर करून धमकी देणार्‍या आरोपीला एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांच्या पथकाने कोलकातामधून अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, 30 ऑगस्टरोजी एका अज्ञात व्यक्तीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता, हा फोन त्यांच्या पीएने घेतला, त्याने तो ट्रान्सफर केला नाही. या अज्ञात व्यक्तीने म्हटले होते की, मातोश्री बंगला उडवून देऊ, मी दुबईतून बोलतोय. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर मातोश्री निवासस्थानाबाहेर पोलिस सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली होती. दरम्यान, मुंबईतील आकाशवाणी आमदार निवास सुद्धा उडवून देण्याची धमकी मिळाली आहे.

ठाकरेंच्या फार्म हाऊसची रेकी
उद्धव ठाकरेंच्या रायगडमधील खालापूर तालुक्यातील भिलवले येथील फार्म हाऊसची काही अज्ञातांनी रेकी केल्याचे प्रकरण सुद्धा काही दिवसांपूर्वी समोर आले होते. फार्म हाऊसवर टुरीस्ट कारने आलेल्या 3-4 जणांनी रेकी केली होती. सुरक्षारक्षकांकडे या लोकांनी चौकशी केली होती. नंतर मुबंई एटीएसने नवी मुबंई टोल नाक्यावर या संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली होती.