NASA कडून 3 भारतीय कंपन्यांना ‘व्हेंटिलेटर’चं ‘उत्पादन’ करण्याची परवानगी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोविड 19 रुग्णांसाठी व्हेंटिलेटर तयार करण्यासाठी अमेरिकेच्या नॅशनल एयरोलॉटिकल अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (नासा) कडून तीन भारतीय कंपन्यांना परवाना (लायसन्स) मिळाला आहे. अल्फा डिझाईन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड, भारत फोर्ज लिमिटेड आणि मेधा सर्व्हो ड्राईव्हस प्रायव्हेट लिमिटेड या तीन कंपन्यांना व्हेंटिलेटर तयार करण्याचा परवाना मिळाला आहे.

शुक्रवारी (दि.29) नासाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ही माहिती दिली आहे. तीन भारतीय कंपन्यांव्यतिरिक्त इतर 18 कंपन्यांनाही व्हेंटिलेटर तयार करण्याचा परवाना देण्यात आला आहे. यामध्ये आठ अमेरिका आणि तीन ब्राझिलियन कंपन्यांचा समावेश आहे. नासा ही अंतराळ संशोधन, वैमानिकी आणि संबंधित कार्यक्रमांसाठी काम करणारी अमेरिकेची स्वतंत्र संस्था आहे. नासाने दक्षिण कॅलिफोर्नियाच्या जेट प्रोपल्शन लॅब (जेएलपी) येथे कोरोना विषाणूच्या रुग्णांसाठी विशेष पद्धतीचे व्हेंटिलेटर विकसित केले आहे.

जेएलपीच्या अभियंत्यांनी एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीत हे विशेष व्हेंटिलेटर ‘व्हाइटल’ डिझाईन केले आहे. 30 एप्रिल रोजी अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाकाडून त्याला आपत्कालीन वापराची परवानगी मिळाली आहे.

नासाचे म्हणणे आहे की, व्हाईटलचे उत्पादन डॉक्टर आणि वैद्यकीय उपकरण निर्मितीच्या सल्ल्यानुसार करण्यात आले आहे. अमेरिकेत आतापर्यंत 1 लाख 02 हजार 836 लोकांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेत या साथीच्या आजाराची लागण झालेल्या लोकांची संख्या 17 लाखापेक्षा अधिक आहे.