टांगा शर्यतीत दगडफेक, पोलीस अधिकाऱ्यासह तिघे जखमी

सिन्नर(नाशिक) : पोलीसनामा ऑनलाईन – सिन्नर तालुक्यातील दापूर येथे टांगा शर्यत थांबविण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर टांगा शौकिनांनी जबर दगडफेक केली. यात वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांच्यासह तीन जण जखमी झाले. ही खळबळजनक घटना आज (सोमवारी) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली.

खंडोबा महाराज यात्रेत घोडा, बैल टांगा शर्यत सुरू असल्याची गुप्त खबर वावी पोलिसांना मिळाली होती. त्याची खात्री करण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक बोरसे, पाच ते सहा कर्मचार्‍यांसह तेलमाथा परिसरात गेले होते. तेथे बंदी असतानाही टांगा शर्यत सुरू असल्याचे आढळून आले. त्यामुळे बोरसे यांनी शर्यत बंद पाडली. तसेच आयोजकांना ताब्यात घेणे व टांग्यासह विविध साहित्य जप्त करण्याची कारवाई सुरू केली. त्याच दरम्यान टांगा शौकीन व पोलिसांमध्ये धुमश्‍चक्री उडाली व एक दगड सहाय्यक निरीक्षक बोरसे यांच्या कानाच्या मागे डोक्यावर लागल्याने ते जखमी झाले. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक माधव पडीले यांनी घटनास्थळी धाव घेतली.

वावी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीपकुमार बोरसे त्यांना उपचारांसाठी दोडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात असून गुन्हे दाखल करण्याचे काम वावी पोलीस ठाण्यात सुरू झाले आहे.