वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – शेतात राखण करण्यास गेलेल्या शेतकऱ्याला वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना वरोरा तालुक्यातील अर्जुनी शिवारात घडली. देवराव भिवाजी जिवतोडे (६०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, वाघ आणि वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, या मागणीसह मृतकाच्या कुटुंबातील सदस्याला अनुकंपा तत्त्वावर नोकरीत सामावून घ्यावे, अन्यथा मृतदेह हलवू देणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने गावात तणावाची स्थिती होती.

महिनाभरापासून अर्जुनी येथे वाघाची दहशत आहे. यापूर्वी तुळसाबाई या महिलेला वाघाने ठार केले होते. त्यानंतर काही जनावरांची शिकारही केली. तर दोन दिवसांपूर्वी एका विद्यार्थ्याला जखमी केले. दरम्यान, शेतात राखण करण्याकरिता देवराव जिवतोडे गेले असता त्यांच्यावर वाघाने हल्ला केला. यात जिवतोडे यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना उघडकीस येताच ग्रामस्थांमध्ये रोष निर्माण झाला. यापूर्वी वन्यप्राणी आणि वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी अनेकदा ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली होती. मात्र, याकडे दुर्लक्ष केल्यामुळे जिवतोडे यांचा बळी गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घटनास्थळी येऊन अर्जुनीवासीयांच्या मागण्या पूर्ण करून मृतकाच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केले. या घटनेनंतर वनविभागाचे अधिकारी आणि पोलीस पथकाने घटनास्थळ गाठून ग्रामस्थांना समजाविण्याचा प्रयत्न केला.

मोहुर्लीचे वनक्षेत्रपाल आर. जी. मून यांनी ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगून शासनदरबारी मृतकाच्या कुटुंबातील सदस्याला अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळवून देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. मात्र, ग्रामस्थांचे समाधान झाले नाही. यामुळे गावात तणावाची स्थिती कायम होती. दरम्यान, सायंकाळी मृतदेह घटनास्थळावरून उचलण्यात आला.