खुलासा ! गरीब, कुरूप आणि दिव्यांगांचे Video हटविण्याच्या तयारीत TikTok

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  एक नवीन खुलासा समोर आला आहे की चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉक (TikTok) लवकरच व्हिडिओ कंटेंटवर मोठे बदल करण्याची तयारी करत आहे. टिकटॉक लवकरच कुरूप, गरीब किंवा दिव्यांग असणार्‍या वापरकर्त्यांचे व्हिडिओ फिल्‍टर करणार आहे. प्राप्त माहितीनुसार, प्रीमियम वापरकर्त्यांमध्ये आपली प्रतिमा सुधारण्यासाठी टिकटॉक काही बदल करणार आहे.

एका वृत्तानुसार, द इंटरसेप्टला एक असा अहवाल मिळाला आहे ज्यामध्ये कंपनीच्या धोरणात होत असलेल्या बदलांचा उल्लेख आहे. या अहवालात, टिकटॉकने आपल्या मॉडरेटर्सना अशाच सूचना दिल्या आहेत. यामध्ये स्पष्टपणे लिहिण्यात आले आहे की जेव्हा जेव्हा वापरकर्ते त्यांच्या टाइमलाइनवर जातील तेव्हा त्यांना असा कंटेंट समोर आला पाहिजे ज्यामुळे त्यांना वाटेल की हे केवळ त्यांच्यासाठी तयार करण्यात आले आहे. याअंतर्गत अनावश्यक कंटेंट फिल्टर करण्याचेही निर्देश आहेत. टिकटॉक ज्या प्रकारचा कंटेंट हटवण्याचे म्हणत आहे त्यावर विशेषकरून तिसऱ्या जगातील देशांमधून मिलियन व्ह्यूज येत असतात.

विशिष्ट प्रकारचे व्हिडिओ हटवण्याच्या सूचना

हे व्हिडिओ फिल्टर करण्यासाठी टिकटॉकच्या मॉडरेटर्सना बऱ्याच प्रकारच्या कॅटॅगरी सुचविल्या गेल्या आहेत. त्यामध्ये शरीराचा असामान्य आकार – खूप जाड किंवा खूप बारीक. या व्यतिरिक्त, जे लोक अतिशय कुरुप दिसतात किंवा कोणत्या रोगांचा सामना करत असतील अशा लोकांचा यात समावेश आहे. ज्यांचे पोशाख चांगले नाहीत किंवा जे लोक गरीब दिसतात अशा लोकांवर देखील बंदी घालण्यास सांगितले आहे. कंपनीचे म्हणणे आहे की कुरूप दिसणाऱ्या लोकांचे व्हिडिओ चांगले दिसत नाहीत, त्यामुळे ते नवीन वापरकर्त्यांना आकर्षित करण्यास सक्षम नसतात. या अहवालानुसार, जिथे हा व्हिडिओ चित्रित करण्यात आला आहे ते ठिकाण जर घाणेरडे असेल किंवा वाईट दिसत असेल तरीही हा व्हिडिओ टाइमलाइनवरून काढला जाईल.

टिकटॉकचे उत्तर

तथापि, टिकटॉकने याबाबत आपले स्पष्टीकरण दिले आहे. टिकटॉकच्या एका प्रवक्त्याने सांगितले की कंपनीचा उद्देश फक्त अनावश्यक कंटेंट जे की समाजासाठी नुकसानदायक आहे, त्यास हटविणे हा आहे. टिकटॉकच्या मते, त्यांना सतत असे अहवाल मिळत आहेत की प्लॅटफॉर्मचा दुरुपयोग केला जात आहे आणि कंपनीला फक्त ते थांबवायचे आहे. कंपनी भेदभाव, गुंडगिरी आणि वाईट सामग्री वापरकर्त्यांना देऊ इच्छित नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या डिसेंबरमध्येही टिकटॉकवर असे आरोप झाले होते की चीनच्या परराष्ट्र धोरणानुसार टिकटॉकवर व्हिडिओला जागा दिली जात आहे. अशी काही प्रकरणे आढळली ज्यात चिनी सरकारवर टीका करणारे व्हिडिओ स्वतःहून हटवले जात होते. यानंतर कंपनीने स्पष्टीकरण दिले होते की केवळ विवादित सामग्रीलाच काढण्यात येत होते.