आशुतोषच्या आत्महत्येवेळी पत्नी मयुरी घरातच होती ! ना भांडण ना आर्थिक चणचण आत्महत्येचं कारण काय ?

पोलीसनामा ऑनलाईन टीम : खुलता कळी खुलेना या मालिकेतील अभिनेत्री मयुरी देशमुख हिचा पती आशुतोष भाकरे यानं आत्महत्या केल्याची घटना कालच (बुधवार दि 29 जुलै 2020) समोर आली आहे. राहत्या घरी गळफास घेऊन आशुतोषनं त्याचं जीवन संपवलं. आशुतोष एक नवोदीत कलाकार होता. त्याच्या अचानक जाण्यानं सर्वजण हादरले आहेत. नांदेड येथील राहत्या घरात त्यानं गळफास घेतला. डिप्रेशनमुळं त्यानं हे पाऊल उचललं असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

कुटुंबातील व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार, आशुतोष भाकरे यानं बुधवार दि 29 जुलै 2020 रोजी सकाळी 11 ते 12 च्या दरम्यान राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. आशुतोषचे आई वडिल नांदेडमधील फेमस डॉक्टर आहेत. आशुतोषची पत्नी मयुरी आणि त्याच्यात कोणतेही मतभेद नव्हते असंही त्यांच्या जवळच्या मित्रांनी सांगितलं आहे. सध्या मयुरी नांदेडमध्येच आहे. दोघांमध्ये कोणताही वाद आणि आर्थिक चणचण नव्हती. लॉकडाऊनमध्ये देखील नवरा बायको एकत्रच होते. सर्व काही सुरळीत असतानाही त्यानं हे पाऊल का उचललं असा प्रश्न समोर येताना दिसत आहे.

नेमकं काय घडलं ?
नांदेडमधील गणेश नगर येथील घरी मयुरी आणि आशुतोषची आई गप्पा मारत होत्या. यावेळी आशुतोष वरच्या खोलीत होता. बराच वेळ आशुतोष खाली आला नाही हे पाहून घरातल्यांनी त्याचा दरवाजा ठोठावला. परंतु आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. जेव्हा घरातल्यांनी बाजूनं जाऊन खोलीत डोकावलं तेव्हा आशुतोषचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसला.

आशुतोषच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्यानं काही मराठी सिनेमात काम केलं आहे. भाकर, इच्यार ठरला पक्का असे त्यानं काम केलेले काही सिनेमे सांगता येतील. जून-जुलै या बहुचर्चित नाटकाची निर्मितीही त्यानं केली होती.