गाळ टाकणाऱ्या टिप्परने काका-पुतण्याला चिरडले

केज (बीड) : पोलीसनामा ऑनलाईन – केज तालुक्यातील भाटुंबा येथील शातात जवळबन तलावातील गाळ टिप्परने टाकण्याचे काम बुधवारी रात्री सुरु होते. यावेळी गाळ घेऊन आलेल्या टिप्परने शेतात झोपलेल्या काका-पुतण्याला चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार आज (गुरुवारी) सकाळी उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना घटनेची माहिती दिली. काका-पुतण्याच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे. सर्जेराव धपाटे (वय-४५) व परमेश्वर धपाटे (वय-२३) असे मृत्यू झालेल्या काका-पुतण्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी धपाटे यांच्या शेतात जवळबन तलावातील गाळ टाकण्याच्या काम सुरु होते. हे काम रात्री उशीरापर्यंत सुरु होते. यामुळे सर्जेराव धपाटे आणि बंटी उर्फ परमेश्वर धपाटे हे शेतातच झोपले. पहाटे टिप्पर गाळ घेऊन आले असता टिप्पर चालकाला सर्जेराव व परमेश्वर हे झोपल्याचे दिसले नाही. चालकाने टिप्पर पुढे घेऊन गेला असता काका पुतण्या टिप्परखाली चिरडले.

टिप्पर चालकाने सकाळी मागील चाकास रक्त पाहिले असता त्याच्या लक्षात हा प्रकार आला. त्याने याची माहिती टिप्पर मालकास दिली आणि तेथून पळ काढला. मालकाने सुपरवायझरला माहिती दिल्यानंतर त्यांनी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. याबाबत सध्या अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला असून चालकाला ताब्यात घेतल्यानंतर खरा प्रकार उघडकीस येईल अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक आनंद झोटे यांनी दिली.