पुणे-सातारा दरम्यानच्या खेड-शिवापूर नाक्यावरील टोलच्या दरात वाढ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे-सातारा रस्त्यावरून चारचाकीने नेहमी प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या खिशाला चांगलीच झळ बसणार आहे. कारण, खेड-शिवापूर नाक्यावरील टोलच्या दरात तब्बल चार टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ उद्यापासुन म्हणजेच दि. 1 एप्रिलपासुन लागू होणार असल्याची माहिती टोल प्रशासनाने दिली आहे.

खेड-शिवापूर नाक्यावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. टोल दरामध्ये वाढ झाल्याने नियमीत चारचाकीमधुन प्रवास करणार्‍यांना चांगलीच झळ सोसावी लागणार आहे. यापुर्वी जीप, कारसह इतर हलक्या वाहनांसाठी 90 रूपये एवढा टोल आकारण्यात येत होता. मात्र, वाढलेल्या दरामुळे आता त्यामध्ये पाच रूपयांची वाढ करण्यात येणार आहे. मिनी बस आणि इतर व्यावसायिक दृष्टीकोनातुन वापरण्यात येणार्‍या वाहनांसाठीही पाच रूपयांची वाढ करण्यात आली आहे. आता नवीन दरानुसार त्यांना 150 रूपयांचा टोल द्यावा लागणार आहे. बस आणि ट्रकच्या टोलमध्ये तब्बल 10 रूपयांची वाढ झाली आहे. आता त्यांना तब्बल 315 रूपये टोल द्यावा लागणार आहे. टोलच्या दरात चार टक्क्यांनी वाढ झाली खरी मात्र मोठया वाहनांना त्याचा चांगलाच फटका बसणार आहे.