धक्कादायक ! दक्षिण मुंबईत व्यापार्‍याचा बुडून मृत्यू

पोलिसनामा ऑनलाईन – दक्षिण मुंबईतील एस.व्ही.पी. रोडवर आढळलेल्या व्यक्तीचा बुडून मृत्यू झाल्याचा अहवाल जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी दिला आहे. या व्यक्तीचा नेमका कसा मृत्यू झाला याचा शोध घेण्यासाठी घटनास्थळावरील सीसी टीव्ही कॅमेर्‍यांतील चित्रणाची तपासणी पोलिसांमार्फत करण्यात येत आहे.

मुसळधार पावसामुळे काल अनेक ठिकाणी मोठया प्रमाणावर पाणी साचले होते. दक्षिण मुंबईतील दुकान बंद करून अब्दुल करीममिया अहमद महाबळेश्वरवाला (वय 42) सायंकाळी सातच्या सुमारास डोंगरी येथील घराच्या दिशेने निघाले होते. वाटेत असताना त्यांनी मोबाइलवरून घरी संपर्कही साधला होता. मात्र रात्र झाली तरीही ते घरी परतले नाहीत. यामुळे त्यांचे कुटुंबीय चिंतेत होते. रात्रभर वाट पाहिल्यानंतर त्यांचा शोध घेण्यासाठी पत्नी घराबाहेर पडली. डोंगरी येथून त्या चालतच निघाल्या. एस. व्ही. पी. रोडवर खेतवाडीजवळ एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडलेली त्यांना दिसली. ती व्यक्ती आपला पती असल्याचे त्यांनी ओळखले.

त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर मृतदेह जेजे रुग्णालयात नेण्यात आला. मृतदेहाच्या शवविच्छेदनाच्या अहवालानुसार अब्दुल यांचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे उघड झाले. अब्दुल यांचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे शवविच्छेदन अहवालावरून स्पष्ट झाले आहे. मात्र ते पाण्यात कसे बुडाले याचा शोध आता पोलीस घेत आहेत. घटनास्थळावरील सीसी टीव्ही कॅमेर्‍यांमधील चित्रण तपासण्यासाठी पोलीस पथक तयार करण्यात आल्याची माहिती ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुलाबराव मोरे यांनी दिली.