जिल्ह्यातील जनता कर्फ्यू मध्ये भद्रावतीतील व्यापार्‍यांचा शनिवार पासुन सहभाग

भद्रावती : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्याचे पालकमंञी ना. विजय भाऊ वडेट्टिवार व जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आवाहन केलेल्या जिल्हा जनता कर्फ्यू मध्ये जिल्हातील सर्व तालुक्यांनी प्रतिसाद दिला असतांना भद्रावती तालुक्याने दि. 26 सप्टेंबर रोज शनिवार पासुन पुर्ण सहभाग घेण्याचा निर्णय भद्रावती येथील समस्त व्यापारी संघटनेने घेतला आहे.

दि. 25 सप्टेंबर ते 1 आक्टोंबर पर्यंत संपुर्ण चंद्रपुर जिल्ह्यात जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने एका बैठकीत घेतला होता. या बैठकीला व्यापारी मंडळी, लोकप्रतिनिधी, पालकमंञी जिल्हाधिकारी व ईतर अधिकारी उपस्थित होते. या जनता कर्फ्यू च्या काळात कोणत्या वस्तूची दुकाने सुरू व कोणत्या वस्तूची दुकाने बंद रहातील या बाबतच्या मार्गदर्शक सूचना जिल्हाधिकार्यांनी दिल्या होत्या. त्या नुसार आज दि. 25 सप्टेंबर रोजी जिल्हातील भद्रावती वगळता सर्व तालुक्यात व्यापार्यांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवली व जनता कर्फ्यू ला सहकार्य केले.

परंतु भद्रावती शहरातील व्यापार्यांनी दि. 16 ते 20 सप्टेंबर पर्यंत स्वयंस्फुर्तिने पाच दिवसाचा जनता कर्फ्यू पाळुन प्रशासनाला सहकार्य केले. त्यामुळे जिल्हा जनता कर्फ्यू च्या काळात किमान सकाळी 9 ते 2 वाजेपर्यंत भद्रावती शहरातील दुकाने चालु राहावीत अशी भद्रावती शहरातील व्यापार्यांची ईच्छा होती. त्या अनुषंगाने भद्रावती शहरातील समस्त व्यापारी संघटनेने तहसीलदारांना एक निवेदन सादर करून सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दुकाने चालु ठेवण्याची परवानगी मागितली. परंतु हा जनता कर्फ्यू असल्यामुळे या बाबतचा निर्णय व्यापारी संघटनेवर सोपवला. त्या नुसार व्यापारी संघटनेने सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व दुकाने चालु ठेवण्याचा निर्णय घेतला. तशा आशयाचा संदेश समाज माध्यमावर प्रसारित केला. त्यानुसार आज दि. 25 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवली. हि गोष्ट जिल्हा प्रशासनाला कळताच भद्रावती च्या तहसीलदारांना विचारना करण्यात आली.

संपुर्ण जिल्हा बंद असतांना भद्रावती शहरच सुरू का ? असा प्रश्न जिल्ह्यातील व्यापार्यासह प्रशासनाला पडला. त्या मुळे तहसीलदार महेश शितोळे यांनी येथील व्यापारी संघटनेला प्रशासनाच्या वतीने जनता कर्फ्यू मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. या आवाहनाला व्यापार्यांनी प्रतिसाद देत दि.26 पासुन सर्व दुकाने बंद ठेवण्याची तयारी दर्शवली. माञ भाजीपाला व फळे नाशवंत असल्यामुळे फक्त 26 सप्टेंबर रोजी हि दुकाने सुरू रहातील त्यानंतर माञ बंद रहातील असा निर्णय व्यापारी संघटनेने घेतला आहे.