‘… तुला बघत रहावंस वाटतं’ , FM मध्ये RJ असणाऱ्या युवतीला पोलीस निरीक्षकाचा मेसेज

तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – नागपूर वाहतूक शाखेतील पोलीस निरीक्षकाने एका एफएम वहिनीत आरजे म्हणून काम करणाऱ्या तरुणीला ‘तू खूप छान दिसतेस, तुला बघत रहावसं वाटतं’, असा मेसेज पाठवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यानंतर महिला आरजेने त्या मेसेजचे स्क्रिनशॉट काढून सोशल मिडीयावर व्हायरल केले. याची दखल घेत वरिष्ठांनी पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली केली. अशोक बागुल असे त्या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे.

नागपूर येथील एफएम वाहिनीमध्ये आरजे म्हणून काम करणाऱ्या तरुणीने वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षकाकडे वाहतूक शाखेतील नवनियुक्त पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांचा मोबाईल क्रमांक मागितला होता. त्यावेळी पोलीस निरीक्षकाने तिला व्हीडीओ कॉल करण्यास सांगितले. त्यावर मोबाईल क्रमांक देण्यासाठी व्हीडीओ कॉलची काय गरज आहे, अशी विचारणा महिला आरजेने केली. त्यावर पोलीस निरीक्षकाने रिप्लाय दिला की, ‘तू खूप छान दिसतेस. तुझा चेहरा बघत रहावस वाटतं, शक्य असल्यास व्हिडिओ कॉल कर.’

पोलीस निरीक्षकाचा हा मेसेज पाहून आरजे तरुणीला धक्काच बसला. तिने सोशल मीडियावर पोलीस निरीक्षकासोबतच्या चॅटिंगचे स्क्रिनशॉट टाकले. आरजे तरुणीची पोस्ट व्हायरल होताच नागपूरमधील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेतली. आरजे तरुणीने प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार अर्जही दिला. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस आयुक्त डॉ. भुषणकुमार उपाध्याय यांनी संबंधित पोलीस निरीक्षकाची नियंत्रण कक्षात बदली केली.

याप्रकरणी सीताबर्डी पोलीस ठाण्यात कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. संबंधित पोलीस निरीक्षकाने यापूर्वी जिल्हा परिषदेतील एका महिला अधिकाऱ्यालाही अशाच आशयाचे मेसेज पाठवले होते, असे समजते. तर वेश्याव्यवसायाप्रकरणी ताब्यात घेतलेल्या महिलांसोबतच्या वागणुकीमुळेही हा अधिकारी वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.