Coronavirus : भारताची मदत करण्यासाठी धावून आलं अमेरिकेचं ‘ट्रम्प’ सरकार, ‘कोरोना’शी लढण्यासाठी देणार 29 लाख डॉलर

वॉशिंगटन : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाला असून भारतात देखील कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना व्हायरसशी सामना करण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी शुक्रवारी दोन हजार अब्ज डॉलर्सच्या प्रोत्साहन विधेयकावर स्वाक्षरी केली. लॉकडाऊनमुळे देशांची अर्थव्यवस्था कमजोर होत असताना अमेरिकेने जगातील सर्व देशांना आर्थिक मदत देण्याचे ठरवले आहे. यापैकी 29 लाख डॉलर्सची मदत भारताला मिळणार आहे. भारताबरोबरच इतर कोरोना बाधित देशांना 17.4 कोटी डॉलरची अतिरिक्त देण्याची घोषणा केली आहे.

अमेरिकेने जाहीर केलेली ही मदत रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रे यासह विविध विभाग आणि एजन्सींच्या यूएस जागतिक प्रतिसाद पॅकेजचा एक भाग आहे. ही आर्थिक मदत जागतिक महामारीचा धोका असलेल्या सर्व देशांना देण्यात येणार आहे. अमेरिकेचे परराष्ट्र खात्याने सांगितले की, ते प्रयोगशाळेतील यंत्रणा प्रस्थापित करण्यासाठी आणि कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी तसेच कोरोनाशी दिल्या जाणाऱ्या लढ्यासाठी वैज्ञानिकांना या रकमेतून मदत मिळणार आहे.

अमेरिकन आंतरराष्ट्रीय विकास एजन्सीच्या उप प्रशासक बोनी ग्लिक यांच्या मते, अमेरिका आपल्या मित्र आणि सहकारी देशांना व्हेंटिलेटरची आवश्यकता असल्यास ती पुरवण्यास तयार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, मोठ्या संख्येने नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर अमेरिकेने व्हेंटिलेटर आणि इतर वैद्यकीय उपकरणांचे उत्पादन वाढवले आहे. अमेरिकेमध्ये बनवण्यात आलेले व्हेंटिलेटरचे इतर देशांमध्येही वितरण करण्यात येणार आहे.