‘त्या’ परिसरातील वीज पुरवठा बंद करा ; तहसीलदारांचे महावितरणला आदेश

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – कुकडीच्या आवर्तनाचे पाणी सध्या श्रीगोंदा तालुक्यातील विविध तलावांमध्ये सोडले आहे. सदर तलावांच्या परिसरातील एक किलोमीटरपर्यंतचा वीज पुरवठा बंद करण्यात यावा, असा आदेश तहसीलदारांनी महावितरणला लेखी नोटिसाद्वारे दिला आहे.

कुकडीच्या पाण्यातून श्रीगोंदा तालुक्यातील तलावांमध्ये पाणी सोडण्यात आले. मात्र तलाव परिसरातील वीज पुरवठा सुरू असल्याने बेकायदा पाणी उपसा सुरू आहे. कुकडीचे आवर्तन पिण्यासाठी सोडण्यात आले आहे. यामधून श्रीगोंदा तालुक्यातील लहान मोठ्या ७२ तलावात पाणी सोडण्याची कार्यवाही सुरू आहे. विसापूर, भावडी, मोहरवाडी, सीना, घोडेगाव, मडकेवाडी (पारगाव), देऊळगावसह इतर काही तलावांत पिण्याच्या पाण्यासाठी टँकर भरण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. त्यामुळे सदर खटला भरण्याची कार्यवाही सुरू आहे.

‘तर कायदेशीर कारवाई करू’

पिण्याचा पाणी प्रश्न विचारात घेऊन तलावातील उपसा थांबविण्यासाठी भरारी पथक नियुक्त करण्यात आले आहे. त्यांनीही तलाव परिसरातील विद्युत रोहित्रांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले होते. मात्र आपण कोणतीही कारवाई केलेली दिसत नाही. त्यामुळे विद्युत रोहित्रांचा वीज पुरवठा खंडित करावा. तसा अहवाल श्रीगोंदा तहसील कार्यालयातील टंचाई शाखेस पाठवावा. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे तहसीलदारांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.