Twitter चा मोठा निर्णय ! कॉपी-पेस्ट ट्वीटला बसणार आळा

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरने एक मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे सर्व पक्ष आणि संस्थांमध्ये काम करणाऱ्या आयटी सेल्सच्या अडचणी वाढल्या आहेत. ट्विटरने असे ट्विट लपविण्याचा निर्णय घेतला आहे जे कॉपी-पेस्ट असेल म्हणजेच जर आपण एखाद्याचे ट्विट कॉपी आणि पेस्ट करत असाल किंवा बरेच लोक समान ट्विट करत असतील तर असे ट्वीट लोकांच्या टाइमलाइनवरून लपवले जाईल. ट्विटरने ट्वीट करून याबाबत माहिती दिली.

ट्विटरने म्हटले की, गेल्या काही वर्षांत त्याच्या व्यासपीठावर कॉपी-पेस्टच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. बरेच लोक एकच ट्विट कॉपी करून ट्वीट करत आहेत. अशा परिस्थितीत आम्ही अशा ट्विटची व्हिजिबलीटी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्विटरने आपल्या नवीन पॉलिसीमध्ये कॉपीपेस्ट ट्वीटचाही समावेश केला आहे. दरम्यान, कॉपी- पेस्टचा उपयोग ऑनलाइन जगात डुप्लिकेट कंटेंटसाठी केला जातो.

ट्विटरने मोबाइल अ‍ॅपमध्ये एक वैशिष्ट्य देखील जारी केले आहे, तेथून आपण आपले ट्विट कॉपी करण्याचा पर्याय बंद करू शकता. त्याचबरोबर कंपनीने अलीकडेच ‘रिट्विट विथ कोट’ फीचरही जारी केले आहे. कॉपी-पेस्टचा वापर सर्वाधिक स्पॅमिंग आणि कोणत्याही कॅम्पेनसाठी केला जातो. बर्‍याचदा आपण पाहिले असेल की हजारो खात्यातून एक सारखी ट्विट केली जातात. हे सर्व ट्रेंडिंग आणि कोणत्या खास व्यक्ती किंवा संस्थेला लक्ष्यित करण्यासाठी केले जाते. याचा सर्वाधिक वापर राजकीय प्रचार करण्यासाठी केला जातो.

कॉपी- पेस्ट ट्विटचे एक नुकसान हेही आहे कि, एखाद्याचा मूळ कन्टेन्ट देखील त्याचे राहत नाही. लोक कॉपी करून आपल्या नावासोबत करतात. अशा परिस्थितीत, खऱ्या कन्टेन्ट क्रिएटरला कमी आणि कॉपी-पेस्ट करणाऱ्या अधिक फायदा होतो.