अडीच वर्षात भाजपचे 22 जण नाराज, त्यापैकी 9 जण राष्ट्रवादीच्या गळाला लागले

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – पहिल्यांदाच महापालिकेच्या सत्तेत आलेल्या भाजपच्या अडीच वर्षांच्या कारभारावर नेत्यांनी आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. भाजपच्या 43 नगरसेवकांपैकी जवळपास निम्मे म्हणजे 22 नगरसेवक नाराज आहेत. महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर 9 नगरसेवक राष्ट्रवादीच्या गळाला लागले आहेत. महापालिकेच्या बदनामीचे शिंतोडे अंगावर नको, अशी बोटचेपी भूमिका घेतल्यानंच भाजपवर आजची वेळ आली आहे.

राज्यात सत्ता, जिल्ह्यात दोन आमदार, एक खासदार अशा स्थितीत सांगली, मिरज आणि कुपवाडमधील जनतेनंही 2018 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या बाजूनं कौल दिला. परंतु अडीच वर्षात पारदर्शी कारभाराच्या नावावर कशी बशी सत्ता टिकली. सुरुवातीला थोड्याफार करबुऱ्या होत्या. परंतु महापौरपद खुले होताच या कुरबुऱ्यांना असंतोषाचं स्वरूप प्राप्त झालं. परंतु भाजपचे दोन्ही आमदार, महापालिका कारभाऱ्यांनी या असंतोषाकडं कानाडोळा केला. आगामी महापौर आणि उमहापौर निवडी निर्विघ्न पार पडतील असं भाजप नेत्यांना वाटलं. परंतु इथेच फसगत झाली.

राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर आक्रमक झाली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील हे माहिर आहेत. त्यांनी भाजपमधील असंतोष हेरला. 6 महिन्यांपासून राष्ट्रवादीनं भाजपला सुरूंग लावण्याचं नियोजन सुरू केलं. या नगरसेवकांची यादी तयार करून त्यांच्याशी संपर्क वाढवला. त्यांच्या राजकीय भवितव्याची हमीही घेतली. त्यातून सध्याचा महापौर, उपमहापौर निवडीचा खेळ रंगला आहे.

12 नगरसेवकांसोबत राष्ट्रवादीनं अर्थपूर्ण बोलणी केली. अडीच वर्षांच्या सत्तेत लक्ष्मीदर्शनापासून लांब असलेल्या या नगरसेवकांनीही भाजपला चकवा दिला आहे. त्यातील 3 जणांना शहराबाहेर हलवण्याचा डाव फसला. परंतु त्यातील 9 जण हे अज्ञातस्थळी रवाना झाले. आता त्यातील 2 जण परतले आहेत. त्यांना काही घरगुती अडचणींमुळं परत यावं लागलं आहे. ते परत जरी आले असले तरी ते मनानं भाजप सोबत कितपत राहतील हा प्रश्न कायम असेल.

भाजपमधील स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांनी स्वत:ला महापालिकेच्या कारभारापासून कायमच दूर ठेवलं आहे. याच नेत्यांमुळं जनतेनं महापालिकेची सत्ता भाजपच्या हाती सोपवल्याचा विसर पडला आहे. स्वत:ची बदनामी नको, भ्रष्ट कारभाराचे शिंतोडे अंगावर नोक या भूमिकेतून भाजपचे नेते महापालिकेचा गाडा हाकत आहेत.

सत्तेचा सोपान मदनभाऊंनाच लाभदायक
महापालिकेच्या स्थापनेपासून तीन वेळा मदन पाटील यांची सत्ता होती. एकदा महाविकास आणि एकदा भाजपची सत्ता आहे. मदनभाऊंच्या काळातही पदासाठी नगरसेवकांमध्ये चढाओढ होत असे. अर्ज भरेपर्यंत त्यांच्या नगरसेवकांमध्येही नाराजी, रुसवेफुगवे, होत. परंतु शेवटी त्यांचा शब्द प्रमाण मानला जात होता. त्यांच्या नेतृत्वाखाली 5 वर्षांचा कालखंड पूर्ण होत असे. महाआघाडीच्या काळात अडीच वर्षानंतर सत्तेला सुरूंग लावला होता. आताही भाजपची वाटचाल त्याच मार्गावर आहे. त्यातून सत्ता टिकवण्यात भाजपला कितीपत यश मिळतं हे मंगळवारी स्पष्ट होणारच आहे.