दुर्देवी ! मातीच्या ढिगार्‍याखाली दबून 2 जणांचा मृत्यू

पोलिसनामा ऑनलाईन – घरासाठी माती काढताना मातीचा ढिगारा कोसळल्याने ढिगार्‍याखाली दबून दोन जणांचा मृत्यू झाला. तर इतर दोन जणांना गंभीर दुखापत झाली असून चार जणांना किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी दुपारी जव्हार तालुक्यातील बोरहट्टी गावात घडली. मनोज यशवंत जाधव (30 वर्ष) आणि मुक्ता सुदाम तराळ (16 वर्ष)अशी ढिगार्‍याखाली दबून मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत.

बोरहट्टी गावातील काही आदिवासी बांधव गावाशेजारील डोंगरावर माती घेण्यासाठी गेले होते. कुटुंबातील नातेवाईक मिळून आठ जण रस्त्यालगत असलेल्या डोंगरातील मातीचे खोदकाम करीत होते. दरम्यान अचानक मातीचा ढिगारा कोसळल्याने खोदकाम करीत असलेल्या या कामगारांच्या अंगावर माती पडली. कोसळलेल्या मातीच्या ढिगार्‍यात मोठाले दगड असल्याने दोघांचाही मातीखाली दाबून मृत्यू झाला. तसेच अन्य दोन व्यक्तींना गंभीर दुखापत झाली तर चार जणांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर जव्हार येथील कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गंभीर दुखापत झालेल्या दोन महिलांना उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रामदास मराड यांनी सांगितले.