Pimpri News : पिंपरीत नववर्षाची सुरुवात वाहनांच्या तोडफोडीने, 7 जण ताब्यात

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरात नवीन वर्षाची पहिल्याच दिवशी वाहनांची तोडफोड करण्यात आली. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन (New Year Celebration) करताना मद्यपान केलेल्या दोघांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून दोन गटामध्ये वाद झाले. याच वादातून रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. ही घटना चिंचवड येथील मोहननगर येथे रात्री साडेबाराच्या सुमारास घडली. याप्रकरणी अल्पवयीन मुलांसह 7 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड येथील मोहननगर या ठिकाणी नववर्षाचं सेलिब्रेशन करण्यासाठी काही तरुण एकत्र जमले होते. त्यांनी मद्यपान केले होते. मात्र, किरकोळ कारणावरुन त्यांच्यात वाद झाले. त्यातूनच रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या सहा चारचाकी आणि रिक्षांच्या काचावर कोयत्याने मारून तोडफोड करत हुल्लडबाजी केली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण होते.

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. हुल्लडबाजी करुन वाहनांची तोडफोड करणाऱ्या दोन्ही गटातील आरोपींचा पोलिसांनी रात्रभर शोध घेतला. पोलिसांनी याप्रकरणी 7 जणांना ताब्यात घेतले आहे. नवीन वर्षाची सुरुवातच तेडफोडीच्या सत्राने झाल्याने नागिरिकामध्ये नाराजी आहे.