कोरोनाबाबत अफवा पसरवणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात, एकजण अल्पवयीन

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – कुक्कुट उत्पादनांमुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असल्याबाबत सोशल माध्यमांवर अफवा पसरवणार्‍या अल्पवयीन मुलासह दोघांना पुणे पोलिसांच्या सायबर शाखेने पकडले आहे. कोरोनाच्या अफवांमुळे राज्यात कोट्यावधी रुपयांचा पोल्ट्री व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. याबाबत पोलिसांनी गंभीर दखल घेऊन अफवा पसरविणार्‍यांचा शोध घेतला होता. त्यानुसार या दोघांना पकडण्यात आले आहे.

मोहम्मद अब्दुल सत्तार (रा. शहासेब, गोदावरी ईस्ट, काकिनाडा, आंधप्रदेश) याला अटक केली आहे. तर, एका 16 वर्षीय मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

देशभरात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढल्याने सर्वसामान्य नागरिक भितीच्या छायेखाली आहेत. त्यात वेगवेगळ्या अफवांमुळे त्यात आणखीनच भर पडत आहे. त्यात सोशल मिडियाच्या माध्यमातून चिकन, अंडी, मटण खाल्याने कोरोना होतो, असे व्हिडीओ आणि मेसेज फिरत आहेत. त्यामुळे पोल्टी व्यावसायाचे कोट्यावधी रुपयांचे हाकनाक नुकसान झाले आहे. अद्यापही ही परिस्थिती पुर्वपदावर आलेली नाही. परंतु, या अफवा या पुर्ण चुकीच्या आहेत. याबाबत औंध परिसरातील महाराष्ट्र शासनाच्या शासनाचे पशु संवर्धन आयुक्तालयाने पुणे पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार केली होती.

या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे हे करत होते. त्यांनी युट्युबवर लोड केलेले व्हिडीओ डिलीट केले. त्यातील एका व्हिडीओची माहिती घेतली असता तो उत्तरप्रदेशमधील एका महिलेच्या मोबाईलवरून तो अपलोड करण्यात आल्याचे समोर आले.

त्यानुसार एक पथकाने याठिकाणी धाव घेतली. त्यावेळी या महिलेने त्यांच्यानावावरील कार्ड हे त्यांच्या बहिणीच्या मुलाला दिल्याचे सांगितले. त्याची माहिती घेतली असतो तोच हे सिमकार्ड वापरत होता. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याचे वय 16 असून, त्यानेच हा व्हिडीओ अपलोड केल्याचे समोर आले. त्याने खोटी माहितीभरून स्वतचा इमेल आयडी तयार केला होता. तसेच, टिकटॉक, तसेच युट्युब व फेसबुकवर खाते उघडले होते. त्यातून त्याने 60 हून अधिक व्हिडीओ अपलोड केले होते.

तर, दुसरा व्हिडीओ हा मोहंम्मद सत्तार याने तयार केल्याचे समोर आले. त्यानुसार, त्याला अटक करण्यात आले. त्याने देखील युट्युबवर चॅनेल काढून त्याद्वारे 80 व्हिडीओ अपलोड केले आहेत. तर, इतरांचा शोध घेण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

कोरोना यामुळे होत नाही…
कुक्कुट उत्पादनामुळे कोरोना होतो, हे चुकूचे आहे. तसे, पशु संवर्धन खात्याने घोषीत केले आहे. अशा अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, तसेच अफवा पसरवू नयेत. अफवा पसरविणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.