गुलबर्ग्यात रिक्षाचालकाचा खुन करणाऱ्यांना पुण्यात अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –  दारू पित असताना किरकोळ कारणावरुन झालेल्या वादात रिक्षाचालकाचा खुन करुन पळून आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट-१ ने बुधवारी मध्यरात्री लोहगाव परिसरात पकडले. त्यांनी अन्य तीन साथीदारांच्या मदतीने जावेद नावाच्या रिक्षाचालकाचा डोक्यात दगड घालून खुन करुन मृतदेह कलबुर्गी -बिदर रेल्वे मार्गावर मृतदेह टाकून पळून पुण्यात आल्याची कबुली दिली आहे. वाडी रेल्वे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून मृतदेहाची ओळख पटण्यापूर्वी पुण्यात आरोपींना पकडण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे.

सचिन रवींद्र मिलिनकेरी (वय २४, रा़ कृष्णा कॉलनी, गुलबर्गा), रेवना सिद्रप्पा दंगापूर (वय २५,रा. संतोष कॉलनी, गुलबर्गा) अशी अटक केल्यांची नावे आहेत. ते रिक्षाचालक असून त्यांनी व त्यांच्या इतर तीन साथीदारांनी जावेद नावाच्या एका रिक्षाचालकाचा खुन केला होता. गुब्बी, छोटू, प्रकाश अशी त्यांच्या तीन साथीदारांची नावे असून ते गुलबर्गा येथेच लपून बसले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या युनिट-चे पोलीस कर्मचारी सचिन जाधव यांना माहिती मिळाली की, कर्नाटकातील गुलबर्गा येथे एकाचा खुन करुन दोघे जण पुण्यात आले आहेत. गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्त प्रदीप देशपांडे, उपायुक्त शिरीष सरदेशपांडे आणि सहायक आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले पाटील, पोलीस उपनिरीक्षक दिनेश पाटील, सचिन जाधव, रिजवान जिनेडी, श्रीकांत वाघवले, इरफान मोमीन, प्रशांत गायकवाड, सुधाकर माने या पथकाने या आरोपींना लोहगाव येथे शोध घेऊन पकडले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी खुन केल्याचे कबुल केले.

दारु पित बसलो असताना झालेल्या वादात जावेद नावाच्या रिक्षाचालकाला मारहाण करुन त्याच्या चेहऱ्यावर दगडाने ठेचून मारले व मृतदेह कलबुर्गी बिदर रेल्वे लाईनच्या कडेला टाकून ते पळून आले होते. लोहगाव येथील मित्राकडे बुधवारी दुपारीच ते आले होते, असे त्यांनी पोलिसांना सांगितले.

याची खात्री करण्यासाठी पुणे पोलिसांनी कर्नाटक पोलिसांशी संपर्क साधल्यावर त्यांनी १९ आॅक्टोंबर रोजी दुपारी साडेचार वाजता कलबुर्गी बिदर रेल्वे मार्गाच्या जवळ एक अनोळखी मृतदेह आढळला असून वाडी रेल्वे पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

पुण्यात पकडलेल्या आरोपींची माहिती कर्नाटक पोलिसांना दिली असून त्यांच्या तीन साथीदारांची माहितीही कळविण्यात आली आहे. गुलबर्गा पोलीस हे लपलेल्या आरोपींचा शोध घेत आहेत. पुण्यात पकडलेल्या या दोन आरोपींना ताब्यात घेण्यासाठी कर्नाटक पोलिसांचे पथक पुण्याकडे येत आहे. या पथकाच्या ताब्यात आरोपींना देण्यात येणार आहे.

जाहिरात