सांगलीत NDRF ची 2 पथके दाखल, पुराचा धोका अद्यापही कायम

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – हवामान खात्याने पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला असून महाबळेश्वर, कोयना परिसरात पडत असलेल्या पावसामुळे सांगलीला पुन्हा पूराचा धोका वाढला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सांगलीत एनडीआरएफची दोन पथके दाखल झाली आहेत.

सांगलीत सध्या कृष्णा नदीची पाणीपातळी ३३ फुटाच्या वर आहे. धोक्याची पातळी ४० फुटइतकी आहे. सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील घाट परिसरात येत्या २ दिवसात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

नवजा येथे १५९ तर, महाबळेश्वर येथे ११२ मिमी पाऊस कोसळला आहे. त्याचबरोबर कोयना येथे १०६ मिमी पाऊस पडला आहे. कोयना धरणातून ५१ हजार २८५ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. रविवारी रात्रभर पाऊस पडत असून अजूनही घाट परिसरात पावसाचा जोर कायम आहे. त्यात दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्याने सांगलीमधील पुराचा धोका वाढला आहे. सांगलीमधील नदीकाठच्या लोकांचे स्थलांतर करण्यास सुरुवात झाली आहे.

दुसरीकडे राधानगरी धरण परिसरात १०७ मिमी पाऊस पडला असून धरणातून ६ हजार २९१ क्युसेक विसर्ग होत आहे. राधानगरीतून पाण्याचा विसर्ग कमी केल्याने कोल्हापूरला काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, त्यावेळी वारणावती धरणातून ११ हजार ८९४ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –