धक्कादायक ! ‘कोरोना’ग्रस्ताच्या अंत्यसंस्कारावेळी 2 नातलगांचा रहस्यमय मृत्यू

जम्मू : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला गेलेल्या दोन नातेवाईकांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. डॉक्टरांनी या दोघांच्या अचानक मृत्यू झाल्याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसल्याचं सांगितलं आहे. पण कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार त्यांनी अंत्यसंस्कारासाठी PPE किट वापरली होती. अतिउष्णतेने त्यामध्ये गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना जम्मूमध्ये घडली असून मृत्यू झालेल्या दोघांचे वय 40 वर्षापेक्षा कमी आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीवर त्याचे नातलग जम्मूच्या तावी नदीच्या जवळ अंत्यसंस्कारासाठी गेले होते. त्यावेळी दोघांचा अचानक मृत्यू झाला. उष्णतेमध्ये त्यांनी कोरोना विषाणूपासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी पीपीई किट घातले होते. काही कळायच्या आत अंत्यसंस्कार विधी पूर्ण होण्यापूर्वीच दोघे जण चक्कर येऊन पडले. यामध्येच त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या एकाचे वय 40 वर्षे तर दुसऱ्याचे वय 35 वर्ष होते.

अनिल चोपडा या नातेवाईकाचा आरोप आहे की, पीपीई किट घातल्यामुळे त्यांना कुणी पाणी पाजलं नाही. आणि डिहायड्रेशनमुळे त्यांचा मृत्यू झाला. चोपडा यांचा एक 65 वर्षाचा नातेवाईक कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे मरण पावला होता. त्याच्या अंत्यसंस्कारासाठी तावी नदीवर शव घेऊन सगळे निघाले होते. पोलीस आणि आरोग्य सेवकांनी प्रोटोकॉलनुसार पीपीई किट घातले होते. पण उन्हाळ्यामुळे दोघांना घेरी आली आणि पाणी न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असे चोपडा म्हणाले.