कोंढव्यातील अपहरण झालेल्या ‘त्या’ २ वर्षांच्या चिमूरडीची ३ तासात सुटका 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कोंढवा परिसरातील २ वर्षाच्या चिमुरडीचे घराजवळ खेळत असताना अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर कोंढवा पोलिसांनी ३ तासात चिमुरडीची सुटका करत अपहरणकर्त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. उमेश बळीराम सासवे (वय. २८, रा. कोंढवा बु.) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

कोंढवा बु. येथून टिळेकरनगर येथे घराजवळ खेळणाऱ्या २ वर्षांच्या मुलीचे शुक्रवारी रात्री साडेसातच्या सुमारास कुणीतरी अनोळखी व्यक्तीने अपहरण केल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करून कोंढवा पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली. त्यावेळी पोलिसांनी परिसरात चौकशी केली. तेव्हा काहीच माहिती मिळत नव्हती. परंतु सीसीटिव्ही फुटेज तपासल्यावर त्यात एक ३० वर्षीय व्यक्ती तिला कडेवर घेऊन जात असल्याचे दिसले. परंतु त्याचा प्रत्यक्षात ओळखणारा कुणी भेटत नव्हता. तसेच अंधार पडलेला असल्याने तपासात व्यत्यय येत होता. त्यामुळे पोलिसांनी पथकं तयार करून स्थानिक लोकांसह ती टिळेकरनगर आणि आजूबाजूच्या परिसरात रवाना केल्या. त्यानंतर पोलिसांनी सीसीटिव्हीतील व्यक्तीबाबत तपास केल्यावर तो उमेश सासवे असून तो टिळेकर नगर येथे गल्ली क्रमांक ४ मध्ये राहण्यास असल्याचे समजले. पोलिसांनी रात्री साडेदहाच्या सुमारास उमेश सासवे याच्या घरी जाऊन पाहणी केली तेव्हा मुलगी त्याच्या घरी मिळून आली.

पोलिसांनी मुलीला तिच्या पालकांच्या ताब्यात सुखरुप सोपवले. तर सासवे याला अटक केली. अपह्रत चिमुरडीचे वडील एका बिल्डींग मटेरियलच्या दुकानात नोकरी करतात. तर सासवे हा बिगारी कामे करतो. त्याने दारूच्या नशेत तिला उचलून नेले असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी सांगितले.

ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, पोलीस निरीक्षक महादेव कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे, पोलीस उपनिरीक्षक सागर काळे, वाडकर, संतोष शिंदे, कर्मचारी योगेश कुंभार, आदर्श चव्हाण, कळंबे, मोरे, कोळगे, साळुंके, पांडूळे, कळंबे, पाटील यांच्या पथकाने केली.