U-19 WC : ‘या’ खेळाडूला लवकरच टीम इंडियामध्ये मिळू शकते संधी ! MS धोनीसोबत होतेय ‘तुलना’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीम इंडियाला दोन वेळा विश्वविजेतेपद मिळवून देणारा कर्णधार एमएस धोनी 12 व्या विश्वचषक (वर्ल्ड कप 2019) पासून टीम इंडियाच्या बाहेर आहे. धोनी संघापासून दूर असल्याने संघ व्यवस्थापन अद्याप विकेटकिपरच्या शोधात आहे. वर्ल्ड कप नंतर टीम मॅनेजमेंटने ऋषभ पंतला संधी दिली. पण त्याच्या कामगिरीने टीम मॅनेजमेंटचा विश्वास जिंकण्यास तो अयशस्वी ठरला. त्याचवेळी ऑस्ट्रेलिया विरुद्ध वन डे मालिकेच्या पहिल्या सामन्यात ऋषभ पंत जखमी झाला आणि त्याच्या जागी केएल राहुलला संधी देण्यात आली. केएल राहुलकडून विकेटकीपिंग करण्याच्या निर्णयाचा सतत विरोध होत आहे. पण भारतीय संघाची ही अडचण आता दूर होताना दिसत आहे.

अंडर 19 वर्ल्डकपचा अंतिम सामना रविवारी खेळविण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाला डकवर्थ लुईस नियमांत तीन गडी राखून पराभव पत्करावा लागला. मात्र, या सामन्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. वास्तविक, बांगलादेशच्या सामन्याची 17 वी ओव्हर सुरु होती. यावेळी चेंडू फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईच्या हातात होता आणि शहादत हुसेन फलंदाजी करीत होता. त्याच्या ओव्हरमधील पहिल्याच चेंडूवर फलंदाजाने बचाव करण्याचा प्रयत्न केला पण यावेळी तो क्रीजवरून किंचित बाहेर आला. चेंडू हुसेनच्या पॅडवर आदळला आणि मागे असलेल्या ध्रुव जुरेलच्या हातात गेला. ध्रुवने वेळ न गमावता स्टंपवर बॉल मारला.

दरम्यान, भारतीय संघ बऱ्याच काळापासून विकेटकीपर शोधत आहे, अशा परिस्थितीत ध्रुव जुराल ही समस्या सोडवू शकेल.