‘मी देखील भरपूर खाज असलेला खासदार’, उदयनराजेंचा निशाणा कोणाकडे ?

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन ’शहरातील पोवई नाका परिसरातील मागील पावणेतीन वर्ष अव्याहत सुरू असलेले ग्रेड सेपरेटर चे काम पूर्णत्वाला जाऊन त्याचे उद्घाटन आम्ही केले आता ग्रेट सेपरेटरच्या भूमिपूजनासाठी जे आले नाहीत ते उद्घाटनाला ही वेळ काढणार नाहीत, हे माहीत होते. त्यामुळे लोकांचा कौल घेऊन आम्ही ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन केलंय. आता उद्घाटन झाले. एकदा मूल जन्माला आल्यावर ते पोटात घालून पुन्हा कसे काय सिझेरियन करतात हे कळत नाही,’ असा घणाघाती टोला भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी लगावलाय.

उपकेंद्र आणि ग्रेड सेपरेटची सुरक्षितता आदी विकासकामांच्या संदर्भात उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची भेट घेतलीय. त्यावेळी ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन पुन्हा करण्यात येणार आहे का? असा प्रश्न विचारल्यावर उदयनराजे म्हणाले, ’ग्रेड सेपरेटरच्या भूमिपूजनप्रसंगी जिल्ह्यातील प्रत्येक जबाबदार लोकप्रतिनिधींना यांना निमंत्रण देण्यात आले होते. पण, संकुचित विचार, नाकर्तेपणा यामुळे कोणी आले नाही,’

तसेच ’मंत्री असेल तर त्यांनी उद्घाटन करायचे असे कोणत्याही कायद्यामध्ये लिहलेले नाही. ते मंत्री असले तरी पहिले आमदार अथवा खासदार आहेत. मी सुद्धा खासदार आहे, त्यांच्यासारखा नाही. तर भरपूर खाज असलेला खासदार आहे. लोकांचे महत्त्वपूर्ण प्रश्न सोडवण्याची की मला भरपूर खाज आहे,’ असा टोला देखील उदयनराजेंनी लगावलाय.

’राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी विनंती करुनही तेव्हा कोणी आले नाही. ग्रेड सेपरेटरचे काम सुरू होते तेव्हा त्यावेळी तेथे स्विमिंग पूल होणार, वाहतुककोंडी होणार, अशा वल्गना अनेक जण करत होते. कोणतेही काम करताना त्रास होत असतो. मुलं एका दिवसात होत नाहीत. मुलं होतानाही नऊ महिने त्रास सहन करावा लागतो. मग, हे ग्रेड सेपरेटरचे काम आहे. त्यामुळे त्रास होणार. काम पूर्ण होताच सगळेजण हात पकडून कॉलर उंचावून होते, असेही उदयनराजे म्हणाले.

मी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना विचारले होते. पण, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर त्यांनीच मला हे ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन करण्यास सांगितल्याचे उदयनराजे यांनी स्पष्ट केलं.

’राज्यातील सर्व मंत्र्यांना बोलवा. त्यांच्या हस्ते ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन घ्या. जिल्हाधिकार्‍यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाला बोलवावे त्यांच्या हस्ते उद्घाटन करून घ्यावे. त्यांना ही बघू द्या, उदयनराजे यांनी मांडलेली संकल्पना योग्य आहे की नाही. कोणीतरी शाब्बासकी कौतुकाची थाप टाकली पाहिजे ना.? लोकांचे कौल घेऊन मी ग्रेड सेपरेटर चे उद्घाटन केलं. बाकीचे रथी-महारथी आले असते तर तेथे भाषणे झाली असती. त्यांनी ग्रेड सेपरेटरमध्ये न जाता स्वतःचे किती योगदान आहे? हे सांगितले असते, असेही उदयनराजे म्हणाले.

स्वप्नात ग्रेड सेपरेटर आला आणि आम्ही त्याला मान्यता दिली, असेही काहीजण बोलले असते. जे भूमिपूजनासाठी वेळ काढून येऊ शकत नाहीत, ते उद्घाटनालाही येणार नाहीत, हे मला माहित होतं. म्हणूनच ‘अभी के अभी’ उद्घाटन केलं. त्यांनी आता काहीही करू द्या, उद्घाटन झाले ते झाले,’ असा टोलाही यावेळी उदयनराजे यांनी लगावलाय.