मुलं मुलींकडे बघणार नाहीतर काय मुलांकडे बघणार ? : उदयनराजे भोसले

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – आपल्या बिनधास्त शैलीमुळे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे नेहमीच चर्चेत असतात. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उदयनराजेंना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान साताऱ्यातील एका महाविद्यालयात उदयनराजे भोसले यांचा विद्यार्थ्यांशी संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यादरम्यान एका विद्यर्थिनीने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिल्यानंतर उपस्थितांनी भुवया उंचावल्या.

आज उदयनराजे भोसले यांनी कोरेगाव इथल्या डी पी भोसले कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी उदयनराजे भोसले यांचा संवाद ठेवण्यात आला होता. यामध्ये एका विद्यार्थिनीने काही टवाळ मुलांकडून छेडछाड होत असल्याची तक्रार केली. ‘काही मुले विद्यार्थिनींना त्रास देतात, मुलींसमोर गाडी आडव्या लावतात’, असा प्रश्न विचारला त्यावर उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या उत्तराने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. यावर उदयनराजे म्हणाले,’जो प्रश्न विचारलाय यावर मी काय उत्तर देऊ मलाच कळत नाही. मात्र ही गोष्ट नैसर्गिक आहे. तुम्हाला थोडा त्रास होईल पण मुलं मुलींकडे बघणार नाहीत तर काय मुलांकडे बघणार?’ असं उत्तर राजेंनी दिलं. नंतर सारवासारव करत उदयनराजे भोसले यांनी ही जर विकृती असेल तर त्याला समजून सांगू म्हणत प्रश्नावर अधिक बोलणं टाळलं.