उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीचा दिवस बदलला, ‘या’ दिवशी होणार शपथविधी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडीकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा करण्यात आली. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी येत्या गुरुवारी (दि. 28) सायंकाळी साडेपाच वाजता शिवाजी पार्क येथे होणार आहे. उद्धव ठाकरे हे ठाकरे घराण्यातील या पदावर विराजमान होणारे पहिले व्यक्ती असणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसने मिळून तयार केलेल्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याचा निर्णय या तीनही पक्षांनी घेतला आहे.

ट्रायडंट हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद देण्याच निर्णय घेण्यात आला. त्यांचा शपथविधी सोहळ्यासाठी महापालिकेला तयारी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे कळतेय. गुरुवारी (दि.28) शिवतीर्थावर अर्थात शिवाजी पार्क मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. उद्धव ठाकरेच महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री होतील अशी चर्चा आधीपासून होती. आज त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीच्या नेतेपदी निवड करण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी मांडला. या प्रस्तावाला महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी अनुमोदन दिले. शरद पवार यांच्या सुचनेनंतर उद्धव ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले.

Visit : Policenama.com