मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान परिषद लढविणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधानपरिषद लढविणार आहेत. एखाद्या आमदाराला राजीनामा देण्यास लावून निवडणुक लढविण्यापेक्षा कोणाला न दुखावता विधान परिषदेमार्फत विधीमंडळावर जाण्यास ठाकरे यांनी पसंती दिली आहे. खासदार संजय राऊत यांनी सामना साठी घेतलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी ही बाब स्पष्ट केली आहे.

याबाबत ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, ही जबाबदारी आली ती पार पाडण्यासाठी जर विधानसभेतून कुणालाही न दुखावता परिषदेत जाऊ शकत असेल तर का नाही जायचं?. मागल्या दारातून, या दारातून, त्या दारातून ते सगळं बोलायला ठीक आहे. मग मी तर म्हणेन मी छपरातून आलो आहे.

महाविकास आघाडीबाबत भाजपा शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याची टिका करीत आहे. त्यावर बोलताना ठाकरे म्हणाले, त्यांनी काश्मीरात अतिरेक्यांशी चर्चा केली होती. फुटीरतावाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांच्या बळावर भाजपा सत्तेवर आला होता. पक्ष फोडून आणलेली माणसं तुम्हाला चालतात. मग त्या पक्षासोबतच हात मिळवला तर काय फरक पडतो. त्या पक्षातले मोठ मोठे नेते घेऊन भाजपासुद्धा त्यांना सामावून घेतलेच आहे ना. कित्येक नेते काँग्रेसमधून त्यांनी घेतलेत. त्यांना आमदारक्या, खासदारक्या किंवा इतर काही गोष्टीसुद्धा दिल्या आहेत. तेसुद्धा त्या विचारधारेवरच होते ना?.