‘या’ नामांकित टुथपेस्ट कंपन्यांना ‘एफडीए’चा दणका

कोलगेट-सेन्सोडाईनचा साडेचार कोटींचा साठा जप्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – डॉक्टर्स रिकमेंडेशन, क्लीनीकली प्रुव्हन, मेडीकली टेस्टेड अशी जाहिरात करणाऱ्या टुथपेस्ट कंपनीला एफडीएने दणका दिला आहे. टुथपेस्टची अशा प्रकारे केली जाणारी भंपक जाहीरातबाजी ग्राहकांची दिशाभूल करणारी असल्याचा ठपका ठेवत एफडीएने कोलगेट आणि सेन्सोडाईन टुथपेस्टचा ४ कोटी ६९ लाख रुपयांचा साठा जप्त केला आहे.

टुथपेस्ट कंपन्यांकडून विक्री वाढविण्यासाठी डॉक्टरांनी सुचविलेले, मेडीकली टेस्टेड, क्लीनीकली प्रुवन, दातांच्या सुरक्षेसाठी अशी जाहीरतबाजी केली जाते. कोलगेट आणि सेन्सोडाईनला कॉस्मेटीक म्हणजेच सौंदर्यप्रसाधने म्हणून परवाना देण्यात आला आहे. औषधे आणि सौंदर्यप्रसाधने कायद्यानुसार कोलगेट आणि सेन्सोडाईन टुथपेस्टच्या वेष्टनावरील मजकूर हा गैरलागू असून तो ग्राहकांची दिशाभूल करणारा आहे. तसेच कोलगेट आणि सेन्सोडाईन टुथपेस्टची अशा प्रकारे केली जाणारी जाहीरात ही गैरालागू आहे. त्याद्वारे ग्राहकांची फसवणूक केली जाते असा ठपका एफडीकडून ठेवण्यात आला आहे.

एफडीएने कोलगेट आणि सेन्सोडाईनचा ४ कोटी ६९ लाख रुपयांचा साठा ठाण्यातून जप्त केला आहे. कोलगेट आणि सेन्सोडाईनच्या निर्मात्या कंपन्या मे. कोलगेट पामोलिव्ह इंडीया आणि मे. ग्लॅक्सो स्मिथलाईन कंझ्यूमर हेल्थ लि. या कंपन्यांवर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.