दुर्देवी ! 14 दिवसाच्या मुलाचा कोरोनामुळं मृत्यू

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाने कहर केला आहे. कोरोनाची दुसरी लाट भीषण असून संसर्ग होण्याचा कालावधीही मिनिटावर आला आहे. महत्त्वाचे म्हणजे या दुसऱ्या लाटेत तरूणांमध्ये संक्रमण अधिक प्रमाणात होत असून आता लहान मुलेही मोठ्या प्रमाणात संक्रमित होत आहे. यामध्ये नवजात बालकांचा सर्वाधिक समावेश असल्याने हाहाकार उडाला आहे. तज्ञांच्या मते, दुसऱ्या लाटेत कोरोनाने रूप बदललं आहे. त्याचा संसर्गाचा वेग पूर्वीपेक्षा अधिक झाला आहे. त्यामुळे लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने त्यांच्यामध्ये संक्रमण वाढले आहे.गुजरात, हरयाणा, दिल्लीसह एनसीआरमध्ये लहान मुलांना कोरोना होण्याचे प्रमाण जास्त आहे. गुजरातमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत असून सुरतच्या न्यू सिविल हॉस्पिटलमध्ये १४ दिवसाच्या चिमुरड्याचा कोरोना संक्रमणामुळे जीव गेला आहे.

या बालकाचे मल्टिपल ऑर्गन फेल झाल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दुसरीकडे एका खासगी रुग्णालयात १४ दिवसांची मुलगी व्हेंटिलेटरवर आहे. कोरोमुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये १५ टक्के मृत्यू तरुणांचा आहे. राज्यात मागील २४ तासात ७ हजार ४१० बाधित आढळले आहे तर ७३ जणांचा मृत्यू झाला आहे.

दिल्लीतही तीच अवस्था आहे. या दुसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग अधिक होत आहे. येथील लोकनायक हॉस्पिटलमध्ये कोरोनाचा संक्रमनाने गंभीर असलेल्या आठ मुलांना उपचारासाठी दाखल केले आहे. या मुलांमध्ये अतिताप, न्यूमोनिया सारखी लक्षणे आढळत आहे यात ८ महिन्यापासून ते १२ वर्षापर्यंत च्या मुलांचा समावेश आहे.

गजियाबादमध्ये १ मार्च ते १४ एप्रिल दरम्यान, दोन हजार १०६ कोरोनाबाधित आढळले. त्यात १३० मुलांचा समावेश असून ० ते १४ वयोगटातील ९७ तर १५ ते १७ वयोगटातील ३३ मुलांचा यात समावेश आहे.कंबाईड हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या बाधित ८ महिन्याच्या मुलाच्या आई वडिलांनाही कोरोनाची लागण झाली आहे. तर हरयाणात १५ मार्च ते ११एप्रिल दरम्यान ४१ हजार ३२४ बाधित आढळले असून त्यामध्ये १० वर्षपेक्षा कमी वय असलेली ३ हजार ४४५ लहान मुलं आहेत. गत वर्षीच्या तुलनेत ही संख्या १ वरून ८ टक्के झाली आहे.