Coronavirus : अमेरिकेवरच आली रशियाकडून व्हेंटिलेटर्स खरेदी करण्याची वेळ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागच्या आठवड्यात मित्र देशांना व्हेंटिलेटर्सचा पुरवठा करण्याची घोषणा केली होती. कोरोना व्हायरसविरोधातील लढ्यात आमच्या मित्र देशांना व्हेंटिलेटर्सची गरज असेल, तर तो पुरवठा करण्यास आम्ही तयार आहोत असे ट्रम्प म्हणाले होते. पण त्यांची ही घोषणा किती पोकळ आहे ते स्पष्ट झाले आहे. कारण अमेरिकाच रशियाकडून व्हेंटिलेटर्सची खरेदी करणार आहे. कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या रशियाकडूनच व्हेंटिलेटर्स, वैद्यकीय साहित्य आणि करोना व्हायरसच्या रुग्णांवर उपचार करताना लागणारी बचावात्मक उपकरणे खरेदी करण्याची वेळ अमेरिकेवर आली आहे.

अमेरिकेत कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. लाखापेक्षा जास्त लोकांना याची लागण झाली आहे. वेळीच आवश्यक पावले उचलली नाहीत तर, अमेरिकेत मृतांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढेल असा अशा इशारा देण्यात आला आहे. अमेरिकेमध्येच वैद्यकीय साहित्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यामध्ये 30 मार्च रोजी फोनवरुन चर्चा झाली. त्यामध्ये रशियाकडून खरेदीचा निर्णय घेण्यात आला. अमेरिका मोठया प्रमाणावर व्हेंटिलेटर्स बनवेल. आम्ही आमच्या गरजा पूर्ण करुच पण त्याचबरोबर दुसर्‍या देशांनाही मदत करु असे ट्रम्प यांचा दावा होता.