UP : मुख्यमंत्री हेल्पलाईनच्या BPO मध्ये खळबळ, 88 कर्मचारी ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

लखनऊ : वृत्तसंस्था – कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रेदशातील मुख्यमंत्री हेल्पलाईन 1076 मध्ये कर्यरत असलेल्या कंपनीच्या 88 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या 88 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर हेल्पलाईन सेंटरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सुरेविन बीओपी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड असे कंपनीचे नाव असून कंपनीला कोरोना संसर्गाबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. लॉकडाऊन मार्गदर्शक तत्त्वांच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप कंपनीवर लावण्यात आला आहे.

सीएमओने कंपनीला बजावलेल्या नोटीसीमध्ये तीन मोठ्या गोष्टींची विचारणा केली आहे. सर्वप्रथम, कार्यालयात, सामाजिक अंतर, स्वच्छता आणि मास्कचा वापर केला होता. जर ते केले नाही तर मग हा निष्काळजीपणा का केला ? दुसरे म्हणजे, एकाच वेळी मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना कार्यालयात का बोलावून घेतले ? आणि तिसरा प्रश्न विचारला तो म्हणजे, कंपनीने कोविड 19 मार्गदर्शक तत्त्वांचे पालन का केले नाही ? असे तीन प्रश्न कंपनीला नोटीसीद्वारे विचारण्यात आले आहेत.

दरम्यान, उत्तर प्रदेशात वाढत्या कोरोना प्रकरणांमध्येही दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. यूपीमध्ये कोरोना रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. म्हणजे याठिकाणी जास्तीत जास्त रुग्ण बरे होत आहेत. सरकारी आकडेवारीनुसार आतापर्यंत यूपीमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 61 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अवनीशकुमार अवस्थी आणि आरोग्य विभागाचे प्रधान सचिव अमित मोहन प्रसाद यांनी दिलेल्या माहतीनुसार, सध्या उत्तर प्रदेशात कोरोनाचे अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संख्या 5064 आहे. राज्यात आत्तापर्यंत 8610 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. याच प्रकारे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 61.10 टक्के आहे.