गॅस सिलिंडरच्या स्फोटाने 2 मजली इमारत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

मऊ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील मऊमध्ये सोमवारी सकाळी सिलिंडरचा स्फोट होऊन दोन मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 12 लोक जखमी झाले. या घटनेत अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मऊ येथील मोहम्मदाबाद कोतवाली परिसरातील वलीदपूर येथे एका घरात सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडली. स्फोट इतका जबरदस्त होता की, दोन मजली इमारत अक्षरश: जमीनदोस्त झाली. घटनास्थळी पोलिस आणि अग्निशमन दल दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरु आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे आणि जखमींवर तत्काळ योग्य ते उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत.

Visit : Policenama.com