प्रकाश आंबेडकरांना मोठा धक्का, ‘वंचित’मधील 45 नेते-पदाधिकार्‍यांचा राजीनामा

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना पक्षातील प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या बंडामुळे मोठा धक्का बसला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या राज्यातील प्रमुख 45 नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा आणि पक्षाचा राजीनामा दिला आहे. नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सामुहिकपणे आपले राजीनामे प्रकाश आंबेडकर यांना पाठवले आहेत. राज्यातील तिसऱ्या राजकीय शक्तिचं स्वप्नं पाहणाऱ्या आंबेडकरांच्या प्रयत्नांना या सामूहिक बंडामुळे मोठी खिळ बसली आहे.

राजीनामे देणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये अकोल्यातील माजी आमदार हरिदास भदे, बळीराम सिरस्कार यांचा समावेश आहे. तसेच पक्षाचे सरचिटणीस नवनाथ पडळकर, वंचितच्या देखरेख समितीचे प्रमुख अर्जून सलगर, सदानंद माळी, बापूसाहेब हटकर यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांनी वंचित बहुजन आघाडीला शेवटचा ‘जय भीम’ केला आहे. राज्यातील महाविकास आघाडीसह भाजपला पर्याय निर्माण करण्याचे प्रकाश आंबेडकर यांचे प्रयत्न होते. मात्र, या सामूहिक बंडामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या प्रयत्नांना खिळ बसली आहे.

राजीनामा देताना पक्षाची विश्वासहार्यता संपल्याचा घणात यासर्वांनी सामूहिक राजीनामापत्रात केला आहे. यातील बरेचजण विधानसभा निवडणुकीपासून पक्षापासून दूर गेले होते. यातील काही जणांवर लवकरच पक्षविरोधी कारवाई करण्यात येणार होती. मात्र, त्या आधीच या सर्वांनी राजीनाम्याचा बॉम्ब टाकल्याचे वंचितच्या सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. तसेच हे नेते शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची शक्यता सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. पक्षातील अनेक बंड शांतपणे पचविणारे प्रकाश आंबेडकर या बंडाकडे कसं पाहतात ? यातून ते काय मार्ग काढतात ? याची उत्सुकता राजकीय वर्तूळामध्ये आहे.